Foreign Exchange Reserves: आज भारतासाठी ऐतिहासिक दिवस आहे. भारताचा परकीय चलनाचा साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्सच्या पुढे गेला आहे. RBI च्या आकडेवारीनुसार, 27 सप्टेंबर 2024 रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा 704.885 अब्ज डॉलरच्या पातळीवर पोहोचला. त्यापूर्वीच्या आठवड्यात हा 692.29 अब्ज डॉलर्सवर होता. म्हणजेच, यात 12.588 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे.
भारताची मोठी झेप
दरम्यान, एफपीआय गुंतवणुकीत प्रचंड वाढ झाल्यामुळे परकीय चलन साठा सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला आहे. विशेष म्हणजे, आता भारताव्यतिरिक्त फक्त चीन, जपान आणि स्वित्झर्लंडकडे 700 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त परकीय चलन साठा आहे. म्हणजेच, जगभरात 700 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त परकीय चलन साठा असणारा भारत चौथ्या क्रमांकाचा देश झाला आहे.
India's forex reserves jump USD 12.588 billion to a new all-time high of USD 704.885 billion for the week ended September 27, says RBI
— Press Trust of India (@PTI_News) October 4, 2024
परकीय चलन साठा सर्वकालीन उच्चांकावर
भारतीय रिझर्व्ह बँकेने 4 ऑक्टोबर 2024 रोजी परकीय चलनाच्या साठ्याचा डेटा जारी केला, त्यानुसार 27 सप्टेंबर 2024 रोजी संपलेल्या आठवड्यात यात $12.588 अब्जने वाढ झाली. या कालावधीत परकीय चलन संपत्ती $ 10.46 अब्जने वाढून $ 616.154 बिलियनवर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, 2024 मध्ये आतापर्यंत परकीय चलनाच्या साठ्यात 80 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढ झाली आहे.
सोन्याच्या साठ्यातही जोरदार वाढ
सोन्याच्या साठ्यातदेखील प्रचंड वाढ झाली आहे. सोन्याचा साठा $ 2.184 अब्जने वाढून $ 657.96 अब्जच्या पातळीवर पोहोचले आहे. तर, SDR $308 मिलियनच्या वाढीसह $18.54 अब्ज झाला आहे. पण, या कालावधीत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये जमा करण्यात आलेला साठा कमी झाला आहे. हा 71 मिलियन डॉलरने घटून 4.38 अब्ज डॉलरवर आला आहे.