Join us  

India Forex Reserves : भारताच्या परकीय चलन साठ्यात मोठी घट, पोहोचला दोन वर्षांच्या नीचांकी स्तरावर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 8:40 AM

शुक्रवारी रिझर्व्ह बँकेनं साप्ताहिक आकडेवारी जाहीर केली आहे.

देशातील परकीय चलनाच्या गंगाजळीत मोठी घट झाली आहे. रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी ही आकडेवारी जाहीर केली. २१ ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यात भारताचा परकीय चलन साठा ३.८४७ अब्ज डॉलर्सने घसरून ५२४.५२ अब्ज डॉलर्स झाला आहे. मागील रिपोर्टींग आठवड्यात एकूण साठा ४.५० अब्ज डॉलर्सने घसरून ५२८.३७ अब्ज डॉलर्स झाला होता. गेल्या अनेक महिन्यांपासून परकीय चलनाच्या साठ्यात घट दिसून येत आहे. आता देशातील परकीय चलन साठा दोन वर्षांतील नीचांकी पातळीवर पोहोचला आहे.

जुलै २०२० नंतर ही देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यात सर्वात मोठी घट नोंदवली गेली आहे. भारताच्या परकीय चलनाच्या साठ्यात एका वर्षात ११६ अब्ज डॉलर्सची घट झाली आहे. वर्षभरापूर्वी, ऑक्टोबर २०२१ मध्ये, देशाच्या परकीय चलन साठ्याने ६४५ अब्ज डॉलर्सचा उच्चांक गाठला होता. देशाच्या चलन साठ्यात घसरण होण्याचे मुख्य कारण रुपयाची घसरण रोखण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले जात आहे. केंद्रीय बँकेला सध्या चलन साठ्यातून मदत मिळत आहे.

सोन्याच्या साठ्यातही घट

शुक्रवारी रिझर्व्ह बँकेने साप्ताहिक आकडेवारी जाहीर केली. २१ ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यात चलन साठ्याच्या महत्त्वाचा घटक मानल्या जाणाऱ्या फॉरेन करन्सी ॲसेट्समध्ये (FCA) ३.५९३ अब्ज डॉलर्सने घट होऊन ४६५.०७५ अब्ज डॉलर्स झाले आहे. मूल्याच्या दृष्टीने देशातील सोन्याचा साठा २४.७ कोटी डॉलर्सने घसरून ३७,२०६ अब्ज डॉलर्स झाला आहे. दरम्यान, स्पेशल ड्रॉइंग राइट्स (SDR) ७० वाढून १७.४४ अब्ज डॉलर्स झाले आहेत.

… म्हणून विकावे लागतायत डॉलर्स

परकीय चलन मालमत्तेमध्ये परकीय चलनाच्या साठ्यामध्ये असलेल्या युरो, पौंड आणि येन यांसारख्या इतर चलनांमधील अवमूल्यनाचा समावेश आहे. आयएमएफसोबक देशाची रिझर्व पोझिशन १४ मिलियन डॉलर्सनं कमी होऊन ४.७९९ अब्ज डॉलर्स झाली असल्याचे रिझर्व्ह बँकेच्या आठवड्याच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. अलीकडच्या आठवड्यात रुपयाने डॉलरच्या तुलनेत ८३.२९ ही विक्रमी नीचांकी पातळी गाठली होती. रुपयाची घसरण थांबवण्यासाठी रिझर्व्ह बँकेला डॉलर्सची विक्री करावी लागते.

अन्य देशांचीही स्थिती खराबजागतिक परिस्थितीमुळे महागाई रोखण्यासाठी जवळपास प्रत्येक देशाच्या केंद्राने व्याजदर वाढवले ​​आहेत. महागड्या आयातीमुळे विविध देशांचे परकीय चलन कमी होत आहे. याचा सर्वाधिक फटका चीनला बसला आहे. या वर्षी १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या कालावधीत चीनचा परकीय चलन साठा १५९ अब्ज डॉलरने कमी झाला आहे. त्यापाठोपाठ भारत आणि रशियाचा क्रमांक आहे. या कालावधीत भारताचा परकीय चलन साठा ८५ अब्ज डॉलर्सने आणि रशियाचा परकीय चलन साठा ६४ अब्ज डॉलर्सने कमी झाला आहे. IMF ने म्हटले आहे की जागतिक चलन साठ्यात एकूण ८८४ अब्ज डॉलर्सची घट झाली आहे. IMF च्या मते, उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या परकीय चलनाच्या साठ्यात पहिल्या सात महिन्यांत ६ टक्क्यांहून अधिक घट झाली आहे.

टॅग्स :भारतअर्थव्यवस्था