नवी दिल्ली: दिवाळीच्या आधी परकीय चलनाच्या गंगाजळीनं नवा विक्रम रचला आहे. ६ नोव्हेंबरला देशाकडे ५६८.४९ अब्ज डॉलरची गंगाजळी होती. हा आतापर्यंतचा विक्रम आहे. परकीय गंगाजळीत एकाच आठवड्यात ७.७७ अब्ज डॉलरची मोठी वाढ झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं शुक्रवारी याबद्दलची आकडेवारी प्रसिद्ध केली. ३० ऑक्टोबरला संपलेल्या आठवड्यात देशाच्या परकीय गंगाजळीत १८.३ कोटी डॉलरची वाढ झाली. त्यामुळे गंगाजळी ५६०.१७ अब्ज डॉलरवर पोहोचली. परकीय चलन मालमत्तेत वाढ झाल्यानं परकीय गंगाजळीत मोठी वृद्धी झाली आहे. आरबीआयच्या आकडेवारीनुसार, परकीय चलन मालमत्ता ६.४०३ अब्ज डॉलरनं वाढून ५२४.७४२ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. परकीय चलन मालमत्ता डॉलरमध्ये मोजण्यात येते. मात्र त्यात युरो, पाऊंड, येनसारख्या अन्य परकीय चलनांचादेखील समावेश असतो.पीटीआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, ६ नोव्हेंबरला संपलेल्या आठवड्यात देशातील सुवर्ण भंडारात १.३२८ अब्ज डॉलरची वाढ झाली. त्यामुळे सुवर्ण भंडार ३७.५८७ अब्ज डॉलरवर गेला. देशाला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत मिळालेला विशेष विड्रॉवल अधिकार ७० लाख डॉलरवरून १.४४८ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत जमा असलेली गंगाजळी ४.६७६ अब्ज डॉलरवर गेली आहे.परकीय गंगाजळी वाढण्याचा अर्थ काय?परकीय गंगाजळी वाढणं देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी सुचिन्ह मानलं जातं. परकीय गंगाजळीत बहुतांशपणे डॉलरचा समावेश असतो. जगभरात डॉलरच्या माध्यमातूनच व्यवहार केले जातात. परकीय गंगाजळीतील वाढीचा दुसरा अर्थ आपला देश आता जास्त आयात करू शकतो.
लक्ष्मी प्रसन्न! परकीय चलनाच्या गंगाजळीनं रचना नवा रेकॉर्ड; आठवड्याभरात प्रचंड वाढ
By कुणाल गवाणकर | Published: November 14, 2020 8:52 AM