India GDP: भारत 2027 पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. ग्लोबल ब्रोकरेज फर्म जेफरीजने हा दावा केला आहे. जेफरीजने आपल्या अहवालात म्हटले की, आर्थिक विकास दरात सातत्याने होणारी वाढ, अनुकूल भू-राजकीय परिस्थिती, बाजार भांडवलाची वाढ, सुधारणांच्या दिशेने उचलली जाणारी पावले आणि मजबूत कॉर्पोरेट कल्चर, यामुळे भारत 2027 पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल.
जर्मनी आणि जपानला मागे टाकणारजेफरीजचे इंडिया इक्विटी विश्लेषक महेश नांदूरकर यांनी त्यांच्या नोटमध्ये लिहिले की, भारत गेल्या 10 वर्षांपासून 7 टक्के वार्षिक विकास दराने वाढत आहे आणि भारतीय अर्थव्यवस्था $3.6 ट्रिलियनच्या अर्थव्यवस्थेसह आठव्या स्थानावरुन पाचव्या स्थानावर पोहचली आहे. भारतीय अर्थव्यवस्था पुढील चार वर्षांत 5 ट्रिलियन डॉलर्सची होईल आणि जर्मनी आणि जपानला मागे टाकून भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल.
2030 पर्यंत मार्केट कॅप 10 ट्रिलियन डॉलर होईलजेफरीजने आपल्या नोटमध्ये लिहिले की, डॉलरच्या बाबतीत भारताचे इक्विटी मार्केट गेल्या 10 ते 20 वर्षांपासून सतत 10-12 टक्के दराने वाढत आहे. भारत आता जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी इक्विटी मार्केट बनली आहे आणि 2030 पर्यंत भारताच्या शेअर बाजाराची मार्केट कॅप $10 ट्रिलियनपर्यंत पोहोचू शकते. सुधारणांच्या दिशेने उचललेल्या ठोस पावलांमुळे भारताचा विकास वेगाने होत राहील. देशांतर्गत गुंतवणुकीत वाढ झाल्यामुळे भारतीय बाजारपेठेतील अस्थिरता कमी झाली आहे.
पीएम मोदींचा दावाअलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनेल, असा दावा केला आहे. जगातील अनेक रेटिंग एजन्सी आणि इन्व्हेस्टमेंट बँकर्सनीही हे भाकीत केले आहे. रेटिंग एजन्सी S&P ग्लोबल रेटिंग्सने डिसेंबर 2023 च्या पहिल्या आठवड्यात हा दावा केला होता.