Join us  

भारताचा आर्थिक विकास दर 2024-25 मध्ये 7 टक्के राहणार, IMF चा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 9:58 PM

GDP Data: आयएमएफने अनेक देशांच्या आर्थिक विकास दराची यादी जाहीर केली आहे.

India GDP Data: भारताचीअर्थव्यवस्था 2024-25 या आर्थिक वर्षात 7 टक्के दराने वाढू शकते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक वाढीचा अंदाज जारी केला आहे. IMF च्या मते, चालू आर्थिक वर्षात भारताचा GDP 7 टक्के राहण्याचा अंदाज आहे. जुलै महिन्यातही आयएमएफने आपल्या अंदाजात 7 टक्के आर्थिक विकास दराचा विश्वास व्यक्त केला होता. एप्रिल 2024 मध्ये जाहीर केलेल्या अंदाजापेक्षा हे 0.2 टक्के अधिक आहे.

IMF ने म्हटले की, आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 8.2 टक्क्यांच्या तुलनेत 2024-25 मध्ये भारतातील GDP वाढ 7 टक्के असेल, तर 2025-26 मध्ये GDP वाढ 6.5 टक्के राहण्याचा अंदाज आहे. IMF च्या म्हणण्यानुसार, कोरोना महामारीच्या काळात दिसलेली मंदी आता संपत असून, अर्थव्यवस्था आता आपल्या क्षमतेनुसार वाढ दर्शवत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनुसार, 2024 मध्ये जागतिक अर्थव्यवस्था 3.2 टक्के दराने वाढ दर्शवेल.

रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षात आर्थिक विकास दर 7.2 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर, जागतिक बँकेने 7 टक्के अंदाज व्यक्त केला आहे. महागाईच्या आघाडीवर, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आपल्या अंदाजात म्हटले आहे की, जागतिक स्तरावर महागाई कमी होईल. 2023 मध्ये 6.7 टक्क्यांच्या तुलनेत 2024 मध्ये महागाई दर 5.8 टक्के राहण्याचा अंदाज आहे. 

भारतासाठीच्या आपल्या अंदाजात, IMF ने म्हटले आहे की, भारतातील चलनवाढीचा दर आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 4.4 टक्के आणि आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 4.1 टक्के असेल. IMF ने आपल्या आउटलुकमध्ये म्हटले की, वस्तूंच्या किमती आता स्थिर होत आहेत, परंतु सेवा किमतीची चलनवाढ अजूनही अनेक क्षेत्रांमध्ये उच्च आहे. आयएमएफच्या म्हणण्यानुसार, जागतिक तणावामुळे वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्यामुळे, मध्यवर्ती बँकांकडून व्याजदरात कपात करण्यास विलंब होऊ शकतो. 

 

टॅग्स :भारतअर्थव्यवस्थागुंतवणूक