India GDP Data Update : भारताच्या आर्थिक वाढीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. सर्व तज्ज्ञ आणि रेटिंग एजन्सीच्या अंदाजांना मागे टाकत भारताच्या जीडीपीने (India GDP) एप्रिल-जूनमध्ये 4 तिमाहीतील सर्वात मोठी वाढ नोंदवली आहे. सरकारने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीत भारताने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 7.8 टक्के विकास दर नोंदवला आहे.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO) ने गुरुवारी सायंकाळी GDP डेटा जारी केला. त्यानुसार, 2023-24 एप्रिल-जूनच्या पहिल्या तिमाहीत विकास दर 7.8 टक्के राहिला आहे. हा 4 तिमाहीतील सर्वाधिक दर आहे. बहुतांश अर्थतज्ज्ञांनी विकास दर 7.7 टक्क्यांपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त केला होता. यापूर्वी, एप्रिल-जून 2022 मध्ये जीडीपी वाढीचा दर 13.1 टक्के होता. जानेवारी-मार्च 2023 मध्ये विकास दर केवळ 6.1 टक्के राहिला.
भारताच्या विकासदरामध्ये बांधकाम आणि उत्पादन क्षेत्राने मोठी भूमिका बजावली. महागाईचा तीव्र दबाव असूनही, ग्राहकांनी उत्पादन क्षेत्राला जोरदार पाठिंबा दिला. एप्रिल-जून तिमाहीत निर्माण क्षेत्राची ग्रोथ रेट 7.9 टक्के राहिली, जी जानेवारी-मार्चमध्ये 10.4 टक्के आणि गेल्या वर्षी एप्रिल-जूनमध्ये 16 टक्के होती. त्याचप्रमाणे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरची ग्रोथ 4.7 टक्के राहिली, जी जानेवारी-मार्च तिमाहीत 4.5 टक्के होती.