Lokmat Money > बिझनेस न्यूज > ई-कॉमर्समध्ये भारताला मोठी संधी

ई-कॉमर्समध्ये भारताला मोठी संधी

मोबाइलच्या संख्येत वाढ; वृद्धीदरामध्ये भारत जगात अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2020 04:22 AM2020-01-01T04:22:37+5:302020-01-01T06:45:14+5:30

मोबाइलच्या संख्येत वाढ; वृद्धीदरामध्ये भारत जगात अव्वल

India has big opportunity in e-commerce | ई-कॉमर्समध्ये भारताला मोठी संधी

ई-कॉमर्समध्ये भारताला मोठी संधी

- प्रसाद गो. जोशी

भारतामधील ई-कॉमर्सच्या क्षेत्रामध्ये वाढ होण्याची मोठी संधी आहे. सन २०१७ ते २०२० या काळामध्ये भारतामध्ये या क्षेत्राची वाढ दरवर्षी ५१ टक्के अशा प्रचंड वेगाने होत असून, हा वेग जगात सर्वाधिक आहे. सन २०२०पर्यंत भारतामधील ई-कॉमर्सची बाजारपेठ १२० अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत विस्तारण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या उद्योगामुळे येत्या दोन वर्षांमध्ये दहा लाख रोजगार निर्माण होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

भारतामध्ये मोबाइल आणि इंटरनेटचा प्रसार वाढत आहे. सध्या भारतामध्ये १.१९० अब्ज मोबाइल वापरकर्ते असून, त्यापैकी ५६० दशलक्ष वापरकर्ते हे इंटरनेट वापरत आहेत. एकूण लोकसंख्येच्या केवळ ४० टक्के एवढीच ही संख्या आहे. भारतामध्ये लवकरच ५जी सेवा सुरू होणार असून, त्यामुळे अधिक इंटरनेट वापरकर्ते पुढे येतील. स्मार्ट फोन आणि इंटरनेटमुळे त्या वापरकर्त्यांचा आॅनलाइन खरेदीकडे कल वाढेल. भारतात ऑनलाइन खरेदीचा वेग वाढत असून, जगातील सर्व देशांपेक्षा तो अधिक आहे.

भारतात ऑनलाइन खरेदीचे तंत्रज्ञान अद्यापही विकसित होत आहे. मात्र देशातील लोकसंख्या व तेवढीच मोठी बाजारपेठ यामुळे या क्षेत्रात वाढीची मोठी संधी आहे. जशजशी बाजारपेठ वाढेल, तसतशा नवनवीन कंपन्या येऊ शकतात. या नवीन कंपन्यांमुळे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. त्याचप्रमाणे या कंपन्यांना साहाय्य आणि अन्य सेवा पुरविण्यासाठी इतरांची गरज लागेल. त्यामधूनही अधिक रोेजगार उपलब्ध होऊ शकतात. देशातील आजची रोजगाराची स्थिती बघता उपलब्ध होणारा प्रत्येक रोजगार हा महत्त्वाचा आहे. अमेरिकेतील आपल्या एवढ्या वर्षांच्या अनुभवाच्या जोरावर फ्लिपकार्ट या कंपनीने भारताच्या ई-कॉमर्स क्षेत्रामध्ये आघाडी घेतली आहे. मात्र या बलाढ्य कंपनीला टक्कर देण्यामध्ये भारतीय कंपन्याही मागे नाहीत. या कंपनीला तोडीस तोड सेवा देण्याचा प्रयत्न भारतीय कंपन्या करीत असून, त्यांचा या क्षेत्रामधील प्रभावही वाढत चाललेला दिसून येतो.

ई-कॉमर्स नेमके काय?
इंटरनेटच्या माध्यमातून एखाद्या वस्तू अथवा सेवेची केलेली खरेदी अथवा विक्री म्हणजे ई-कॉमर्स होय. यामध्ये वस्तूची आॅर्डर अथवा तिचे पैसे हे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून दिले जातात. भारतामध्ये मात्र कॅश आॅन डिलिव्हरी हा पर्यायच मोठ्या प्रमाणामध्ये निवडला जातो. ई-कॉमर्समध्ये व्यावसायिक ते व्यावसायिक, व्यावसायिक ते ग्राहक अथवा ग्राहक ते ग्राहक अशा स्वरूपाचे व्यवहार होऊ शकतात.
 

Web Title: India has big opportunity in e-commerce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.