Salary Hike in 2025 : उद्यापासून मार्च महिना सुरू होत आहे. या महिन्यात विद्यार्थ्यांना जशी सुट्टीची ओढ लागते, तसे नोकरदारांना पगारवाढीचे वेध लागलात. या महिन्यात बहुतेक कंपन्या आपल्या पगारवाढीची प्रक्रिया सुरू करतात. यासाठी कामाचे मूल्यमापन केले जाते. लवकरच तुमच्याही खात्यात पगारवाढीचा मॅसेज येईल. मात्र, दरवेळी किती पगारवाढ होणार? हा कायम चर्चेचा विषय असतो. जर तुम्हीही याचा विचार करत असाल तर यावर्षी देशातील कंपन्या सरासरी पगारात ९.४ टक्क्यांनी वाढ करू शकतात. गेल्यावर्षीच्या तुलनेत ही पगारवाढी थोडी कमी असणार आहे.
यंदा किती टक्के पगारवाढ होणार?
'ईवाई फ्युचर ऑफ पे' अहवालानुसार, भारतातील १० पैकी ६ कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना सन्मानित करणे आणि वेतन धोरणांसाठी पुढील ३ वर्षांमध्ये AI चा वापर करू शकतात. अहवालानुसार, भारतीय कंपन्यांमध्ये २०२५ मध्ये सरासरी ९.४ टक्के पगारवाढ होऊ शकते. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ कमी आहे. कर्मचाऱ्यांची गळती दर २०२३ मध्ये १८.३ टक्क्यांवरून २०२४ मध्ये १७.५ टक्क्यांवर आला आहे.
सर्वाधिक पगारवाढ कोणत्या क्षेत्रात?
सध्या ई कॉमर्स क्षेत्राचा झपाट्याने प्रसार होत आहे. या क्षेत्रात सर्वाधिक रोजगार निर्मिती होत आहे. याचा फायदाही या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. अहवालानुसार, २०२५ मध्ये ई-कॉमर्स क्षेत्रात सर्वाधिक १०.५ टक्के पगारवाढ अपेक्षित आहे. ऑनलाइन व्यवसायाचा वेगवान विस्तार, ग्राहकांचा वाढता खर्च आणि तांत्रिक वाढ यामुळे या क्षेत्रात मनुष्यबळाची मागणी आहे. त्या खालोखाल वित्तीय सेवा क्षेत्रात १०.३ टक्के, ग्लोबल कॅपेसिटी सेंटरमध्ये १०.२ टक्के पगारवाढ होण्याची शक्यता आहे. तर यंदा माहिती तंत्रज्ञान (IT) आणि IT-सक्षम सेवा क्षेत्रात पगारवाढ अपेक्षापेक्षा कमी होईल.
आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना फटका
आयटी क्षेत्रातील पगारवाढ २०२४ मधील ९.८ टक्क्यांवरून २०२५ मध्ये ९.६ टक्क्यांपर्यंत घसरण्याची अपेक्षा आहे, तर आयटी-सक्षम सेवांमधील पगारवाढ ९.२ टक्क्यांवरून ९ टक्क्यांपर्यंत घसरण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, ऑटो, फार्मास्युटिकल आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात स्थिर पगार राहील.