लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : आर्थिक विकासाच्या बाबतीत जगभरात नकारात्मक कल असताना भारतच केवळ परिणामरहित राहिला आहे. इतकेच नव्हे, तर अशा परिस्थितीत भारत उत्तम कामगिरी करीत आहे, असे प्रशंसोद्गार आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने काढले आहेत. अन्य देशांच्या तुलनेत भारत हा एक चमकता ठिपका (ब्राइट स्पॉट) आहे, असेही नाणेनिधीने म्हटले आहे.आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे आशिया व प्रशांत विभागाचे संचालक कृष्णा श्रीनिवासन यांनी एका मुलाखतीत सांगितले की, जगाच्या अनेक भागांत सध्या आर्थिक विकास मंदावलेला दिसत आहे. त्याचवेळी महागाईही वाढत आहे.
आमच्या अंदाजानुसार एकतृतीयांश जागतिक अर्थव्यवस्था यंदा किंवा पुढील वर्षी मंदीच्या विळख्यात सापडेल. त्यातच महागाईही वाढत आहे. प्रत्येक देशाची वाटचाल संथ होत असताना भारत अधिक चांगली कामगिरी करीत आहे. विभागातील अन्य देशांच्या तुलनेत भारत हा एक चमकता ठिपका आहे. अमेरिका, युरोपीय संघ आणि चीन या मोठ्या जागतिक अर्थव्यवस्थांची चाके रुतलेलीच राहतील, असेही नाणेनिधीने म्हटले आहे.
विकास दरावर महागाईचा परिणाममहागाईमुळे ग्राहक मागणी कमी होत आहे. महागाई रोखण्यासाठी कडक पतधोरण स्वीकारल्यास गुंतवणूक घटते. या दोन्ही कारणांमुळे भारतात काही प्रमाणात नरमाईचा कल दिसत आहे. त्यामुळे आम्ही विकास दर घटवला आहे. मात्र, भारत सरकारच्या भांडवली खर्च योजना महत्त्वाकांक्षी आहेत. त्या सरकारने कायम ठेवल्यास ग्राहक मागणी वाढू शकते, असे श्रीनिवासन यांनी सांगितले.
विकासाची गती लक्षात घेऊन तयार करावा लागेल अर्थसंकल्पवॉशिंग्टन : देशाच्या आर्थिक विकासाची गती कायम राहील आणि महागाईदेखील नियंत्रणात असेल, अशा पद्धतीने आगामी अर्थसंकल्प तयार करावा लागेल, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले आहे. n आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकीला उपस्थित राहण्यासाठी सीतारामन या वॉशिंग्टनला आलेल्या आहेत. त्यानिमित्त एका कार्यक्रमात म्हणाल्या की, विकास कायम कसा ठेवणार, हा प्रश्न त्यातून निर्माण होतो. हेच तर पाहायचे आहे.n कोविड-१९ साथीतून बाहेर आल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेने जी गती प्राप्त केली आहे, ती पुढील वर्षीही कायम राहायला हवी. त्यासाठी अर्थसंकल्प अधिक काळजीपूर्वक तयार करावा लागेल.
‘रुपे’ स्वीकारण्याबाबत अनेक देशांशी चर्चासीतारामन यांनी सांगितले की, रुपे कार्डची स्वीकारार्हता वाढविण्यासाठी भारत अनेक देशांशी चर्चा करीत आहे. सिंगापूर आणि संयुक्त अरब आमिरात हे देश रुपेला स्वीकारण्यासाठी पुढेही आले आहेत.
जगभरात यूपीआयला नेण्यासाठी प्रयत्नसीतारामन म्हणाल्या की, यूपीआय, भीम ॲप आणि एनसीपीआय या पेमेंट यंत्रणांत सुधारणा केली जात आहे. अन्य देशांतील पेमेंट यंत्रणांशी या यंत्रणा जुळवून घेऊन काम कशा करू शकतील, यावर विचार हाेत आहे.