लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : इलेक्ट्रॉनिक्स सुट्या भागांचे भारतातील उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढत असून, भारत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाचे प्रमुख केंद्र (इलेक्ट्रॉनिक्स हब) बनत आहे. इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची भारताची आयातही त्यामुळे मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.
‘ईटी’ने जारी केलेल्या एका अहवालानुसार, भारतात उत्पादित होत असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स साहित्यात मॅकेनिक्स, व्हायब्रेटर मोटारी, चार्जर ॲडॉप्टर आणि स्मार्टफोनचे विविध प्लास्टिक सुटे भाग यांचा समावेश आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, वित्त वर्ष २०२३-२४ मध्ये एप्रिल ते जानेवारी या कालावधीत स्मार्टफोनसारख्या संपूर्ण जुळणी (असेंबल) केलेल्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची भारताची आयात ४० टक्के घटली आहे.
कॅमेरा मॉड्यूल, डिस्प्ले असेंब्ली आणि बॅटरी पॅक यांच्या आयातीत मात्र वाढ झाली आहे. डिस्प्ले असेंब्लीची आयात सर्वाधिक २०० टक्के वाढली. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, वित्त वर्ष २०२३-२४ च्या पहिल्या ९ महिन्यांत भारताची इलेक्ट्रॉनिक्स निर्यात २२.२४ टक्के वाढून २० अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. ॲपल आणि सॅमसंग यांच्या स्मार्टफोनची निर्यात वाढल्यामुळे ही वाढ झाली आहे.
उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेमुळे गती n‘ईटी’ने म्हटले की, उत्पादन-आधारित प्रोत्साहन योजनेमुळे (पीएलआय) स्मार्टफोनचे सुटे भाग भारतात उत्पादित करण्यास गती मिळाली आहे. nस्मार्टफोनच्या प्लास्टिकच्या सुट्या भागांच्या आयातीत वित्त वर्ष २०२४ च्या पहिल्या १० महिन्यांत आकाराच्या (व्हॉल्यूम) बाबतीत ३३ टक्के, तर मूल्याच्या (व्हॅल्यू) बाबतीत २६.५% घसरण झाली आहे. चार्जर ॲडॉप्टरच्या आयातीत ७२ टक्के कपात झाली आहे.