नवी दिल्ली : जगाची फॅक्टरी अशी चीनची ओळख आहे. प्रचंड उत्पादन आणि निर्यातीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर चीनचा वरचष्मा आहे. मात्र, जगभरातील आघाडीच्या कंपन्या चीनमधून बाहेर पडण्यास सुरूवात झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, या कंपन्यांचे आवडता पर्याय भारत आहे. ८८ टक्के कंपन्या भारताला सर्वाेत्तम पर्याय मानतात.
जगभरातील बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या सर्वेक्षणातून ही माहिती समाेर आली आहे. आयएमए इंडिया २०२३ ग्लाेब ऑपरेशन्स बेंचमार्किंग सर्वेक्षणात त्यात १०० सीईओंची मते नाेंदविण्यात आली. ८८ टक्के सीईओंची प्रथम पसंती भारताला हाेती. जवळपास प्रत्येक बड्या कंपनीचे चीनमध्ये उत्पादन आहे. मात्र, आता कंपन्यांना ड्रॅगन नकाेसा झाला आहे. सर्वेक्षणात ‘बिझनेस टू बिझनेस’ व्यवसायात उलाढाल करणाऱ्या विदेशी कंपन्यांचा सहभाग हाेता.
चीनवर अविश्वास
सर्वेक्षणानुसार, बहुराष्ट्रीय कंपन्यांचा चीनवरील अविश्वास वाढत आहे.
चीनची भूराजकीय आक्रमकता, संशयास्पद व्यापार आणि व्यावसायिक धाेरणे तसेच वाढत्या खर्चामुळे चीनबद्दल साशंकता आणि अविश्वास आहे.
या कंपन्या चीनचा पर्याय वेगाने शाेधत आहेत. या शर्यतीत भारत सर्वात पुढे आहे.
भारतात काम सुरू करण्याचे या कंपन्यांना अनेक फायदेदेखील आहेत.
५ वर्षांत भारतात संधी वाढल्या
गेल्या पाच वर्षांमध्ये भारतात या कंपन्यांचा सहभाग वाढला आहे. त्यामुळे भारतातही विविध संधी निर्माण झाल्या आहेत.
जागतिक मनुष्यबळात भारताचा वाटा २२.४%वरून २४.९ टक्के झाला आहे.
जागतिक महसूल निर्मितीमध्ये भारताचा वाटा १४.८ टक्क्यांवरून १५.८ टक्के झाला आहे.
या देशांनाही पसंती
स्वत:च्या देशाशिवाय व्हिएतनाम, थायलॅंड या देशांना कंपन्यांनी पसंती दिली.