नवी दिल्ली :
आपल्या आयुष्याची गाडी पुढे नेणाऱ्या पेट्रोल-डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, सीएनजी या सर्व इंधनांची किंमत काही दिवसांत अतिशय झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे जगातील सर्वात महाग एलपीजी सध्या भारतामध्ये मिळत असून ग्रामीण भागात अनेकांनी गॅसऐवजी चुलीवर स्वयंपाक करण्यास सुरुवात केली आहे.
२०१४ नंतर एलपीजी सिलिंडरच्या किमतीत जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. आजच्या घडीला दरडोई उत्पन्नाच्या तुलनेत विचार केल्यास आपल्याला खरेदी करावे लागणारा एलपीजी, पेट्रोल आणि डिझेल हे जगातील सगळ्यात महाग दरांमध्ये येतात. हे इंधन इतके महाग का, याचे उत्तर चलनांच्या क्रयशक्तीनुसार मोजले तर मिळते. यानुसार देशातील पेट्रोलची प्रतिलिटर किंमत ही जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर डिझेलच्या किमतीच्या बाबतीत आपण जगात ८ व्या क्रमांकावर आहोत.
पाकिस्तानी नागरिकांना एक लिटर पेट्रोलसाठी २३.८ टक्के, नेपाळी ३८.२ टक्के तर आफ्रिकेतील बुरुंडी देशाला दिवसाच्या दरडोई उत्पन्नाच्या तब्बल १८१.८ टक्के किंमत १ लिटर पेट्रोलसाठी मोजावी लागते. विकसित देशांमध्ये मात्र एलपीजी खरेदीसाठी केवळ १ ते २ टक्के रक्कम खर्च करावी लागत आहे.
$३.५ एक लिटर एलपीजीदरडोई उत्पन्नाच्या तुलनेत विचार केल्यास भारतीय नागरिक एलपीजी सिलिंडरसाठी जगात सर्वाधिक किंमत मोजत आहेत.- एलपीजीसाठी भारताला आंतरराष्ट्रीय डॉलरमध्ये ३.५ डॉलर मोजावे लागतात. - तुर्की व फिजी या देशांना कमी पैसे एलपीजी खरेदीसाठी लागतात.
१०० रुपये उत्पन्नातील २३ रुपये पेट्रोलसाठी...- प्रत्येक देशातल्या नागरिकांच्या उत्पन्नात बरीच तफावत असते. म्हणजे समजा एक अमेरिकन नागरिक एक लिटर पेट्रोल भरतो तेव्हा त्याची किंमत ही त्याच्या दिवसाच्या दरडोई उत्पन्नाच्या ०.६% एवढी असते. - स्पेनमध्ये ही किंमत उत्पन्नाच्या २.२ टक्के असते. जेव्हा भारतातील नागरिक गाडीत एक लिटर पेट्रोल भरतो तेव्हा तो त्याच्या दिवसभरात एकूण उत्पन्नाच्या २३.५ टक्के इतकी किंमत मोजत असतो.
तो डिझेलसाठी २०.९% व एलपीजीसाठी १५.६ टक्के किंमत मोजत आहे. म्हणजेच जर भारतीय नागरिक दिवसाला १०० रुपये कमावत असेल तर त्याला एक लिटर पेट्रोलसाठी २३ रुपये खर्च करावे लागतात.