देशातील सर्वात मोठी सिमेंट उत्पादक कंपनी अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड एक मोठा करार करण्याच्या तयारीत आहे. खरेतर, अल्ट्राटेकने, केसोराम इंडस्ट्रीज लिमिटेडची सिमेंट मालमत्ता मिळविण्यासंदर्भात स्वारस्य दाखवले आहे. CNBC-TV18 ने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, सध्या अल्ट्राटेक केसोराममधील विद्यमान प्रमोटर्सचे स्टेक विकत घेण्याची अथवा केसोरामचा सिमेंट व्यवसाय विकत घेण्याची योजना आखत आहे. मात्र, यासंदर्भात अद्याप अल्ट्राटेक आणि केसोराम इंडस्ट्रीज या दोघांकडूनही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
केसोराम इंडस्ट्रीज ही बीके बिर्ला समूहाची कंपनी आहे. जी सिमेंटपासून ते रेयॉनपर्यंतचे उत्पादन करते. महत्वाचे म्हणजे, ही कंपनी सल्फ्यूरिक अॅसिड, सोडियम सल्फेट आणि कार्बन-डायसल्फाइडचेही उत्पादन करते. मात्र कंपनीच्या उत्पन्नात सर्वाधिक वाटा सिमेंटचा आहे. या चर्चेतच, अल्ट्राटेक सीमेंटचा शेअर 1.8% ने घसरून ₹8,603 वर आला आहे. तर, केसोराम इंडस्ट्रीजचा शेअर 5% ने वाढून ₹123.27 वर पोहोचला आहे.
अदानी समूहाचाही वाढतोय दबदबा -
सिमेंट उद्योगात गौतम अदानी समूहही आपला दबदबा वाढवताना दिसत आहे. गेल्या वर्षात अदानी समूहाच्या पोर्टफोलिओमध्ये अंबुजा सिमेंट्स आणि एसीसी जोडले गेले आहेत. तसेच, याच वर्षात सांघी इंडस्ट्रीजच्या उद्योगाचेही अधिग्रहण करण्यात आले. याशिवाय, वदराज सिमेंटच्या खरेदीसाठीही अदानी समूहासह अनेक कंपन्या रांगेत असल्याचे वृत्त आहे.