Join us  

भारताने सुरू केली ‘रणनीतिक साठ्या’तून खनिज तेलाची विक्री, सरकारने आखले नवे धोरण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 7:02 AM

crude oil : इंडियन स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्हस् लिमिटेड (आयएसपीआरएल) या कंपनीकडून भारताच्या केंद्रीय खनिज तेलसाठ्याचे व्यवस्थापन केले जाते.

नवी दिल्ली : भारत सरकारने आपल्या ‘रणनीतिक पेट्रोलियम साठ्या’तून (एसपीआर) सरकारी तेल कंपन्यांना खनिज तेलाची विक्री सुरू केली आहे. केंद्रीय तेलसाठा सुविधांचे व्यावसायीकरण करण्याच्या नव्या धोरणांतर्गत हे पाऊल उचलण्यात आले आहे.  इंडियन स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्हस् लिमिटेड (आयएसपीआरएल) या कंपनीकडून भारताच्या केंद्रीय खनिज तेलसाठ्याचे व्यवस्थापन केले जाते. ३७ दशलक्ष बॅरल साठवण क्षमतेपैकी ३० टक्के क्षमता भारतीय, तसेच विदेशी कंपन्यांना भाड्याने देण्याचा निर्णय भारत सरकारने घेतल्याचे वृत्त मागच्याच महिन्यात एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने दिले होते. त्यापाठोपाठ या तेलसाठ्यातून सरकारी तेल कंपन्यांना तेल विक्री सुरू करण्यात आल्याचे वृत्त आले आहे. गेल्या वर्षी आएसपीआरएलने स्वस्त तेलाने एसपीआर साठे भरून घेतले होते. साठवण सुविधा भाडेपट्ट्यावर द्यायची असल्यास हे साठे रिकामे करावे लागणार आहे. म्हणून ही तेल विक्री केली जात आहे, असे जाणकार सूत्रांनी सांगितले. अबुधाबी नॅशनल ऑइल कंपनीला (एडीएनओसी) मंगळुरू एसपीआरमधील ११ दशलक्ष बॅरल क्षमतेच्या दोन चेंबरपैकी एक चेंबर भाडेपट्ट्यावर देण्यात आले आहे. सरकारी मालकीच्या मंगलौर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लि. आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्प यांनाही काही साठवण क्षमता भाडेपट्ट्यावर दिल्या जाणार आहेत. त्यासाठी आयएसपीआरएल हळूहळू ८ दशलक्ष बॅरल तेलाची विक्री करणार आहे. यंदा खनिज तेलाच्या किमतींत मोठी वाढ झाली आहे. 

सरकारी कंपन्यांना सवलतीच्या दरात तेलnओपेक प्लस देशांनी उत्पादनात कपात केल्यामुळे ही दरवाढ झाली आहे. त्यामुळे रिफायनरींना उच्च दराने कच्चे तेल खरेदी करावे लागत आहे. nवरील दोन्ही सरकारी कंपन्यांना मात्र आयएसपीआरएलकडून सवलतीच्या दरात तेल पुरवठा केला जाणार आहे. भारत हा जगातील तिसरा मोठा तेल आयातदार देश आहे.

टॅग्स :खनिज तेलव्यवसाय