Join us

ऑनलाइन गेमिंगमध्ये भारत आघाडीवर; ५जीने होणार आणखी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 10:20 AM

भारत जगातील ५ सर्वोच्च गेमिंग बाजारात समाविष्ट आहे. वित्त वर्ष २०२३-२४ च्या अखेरपर्यंत भारतीय गेमिंग उद्योगाचे उत्पन्न २९,४०० कोटी रुपयांपेक्षा अधिक होईल.

नवी दिल्ली : भारतात ऑनलाइन गेमिंग उद्योग वार्षिक ३८ टक्के दराने वाढत आहे. ५जी दूरसंचार सेवा सुरू झाल्यानंतर हा दर आणखी वाढेल. त्यातुलनेत ऑनलाइन गेमिंग उद्योगाचा वृद्धीदर अमेरिकेत १० टक्के, तर चीनमध्ये ८ टक्के आहे, असे बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप आणि व्हेंचर कॅपिटल फर्म सिकोइया यांनी जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे.

‘केपीएमजी’नुसार,  देशात ४०० पेक्षा अधिक गेमिंग कंपन्या आहेत. तसेच ४२ कोटी ऑनलाइन गेमर्स आहेत. यापेक्षा अधिक संख्या केवळ चीनमध्ये आहे. भारत जगातील ५ सर्वोच्च गेमिंग बाजारात समाविष्ट आहे. वित्त वर्ष २०२३-२४ च्या अखेरपर्यंत भारतीय गेमिंग उद्योगाचे उत्पन्न २९,४०० कोटी रुपयांपेक्षा अधिक होईल.

गुगल-मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्या चालवताहेत प्रकल्पगुगल आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या कंपन्या आधीपासूनच क्लाऊड गेमिंग प्रोजेक्ट्सवर काम करीत आहेत. गुगलने २०२० मध्ये ४जी आणि ५जी नेटवर्कवर स्टॅडिया क्लाऊड गेमिंगचे परीक्षण केले आहे. मायक्रोसॉफ्टने कोरियाई कंपनी एसके टेलिकॉमसोबत भागीदारी केली आहे.

गेमिंग उद्योगासाठी स्वतंत्र नियामक आवश्यक : सरकारभारतातील ऑनलाइन गेमिंग उद्योगावर सरकारच्या एका समितीने आपला अहवाल तयार केला असून, यासाठी स्वतंत्र नियामक बनवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हे नियामक प्रत्येक गेमला वेगवेगळ्या श्रेणीमध्ये टाकेल. तसेच हे नियामक अनेक नियम बनवण्यासह ॲानलाईन गॅम्बलिंगच्या विरोधात कठोर पावले उचलेल.

एअरटेलचे गेमिंगकडे विशेष लक्षभारती एअरटेल डिजिटलचे सीईओ आदर्श नायर यांनी सांगितले की, गेमिंग क्षेत्र हे आमच्या व्यावसायिक धोरणाचा केंद्रबिंदू असेल. कारण ५जी तंत्रज्ञानात किमान लेटन्सी आणि उच्च गती मिळणार असल्यामुळे हे तंत्रज्ञान गेमिंगसाठी सर्वाधिक वापरले जाईल.

५जी सोबत सुरू होणार क्लाऊड गेमिंगचे नवे पर्वया वर्षाच्या अखेरपर्यंत देशात ५जी दूरसंचार सेवा सुरू होणार आहे. त्याआधीच फ्रान्सची क्लाऊड गेमिंग संस्था ब्लॅकनटने रिलायन्स जिओ आणि एअरटेलसोबत वाटाघाटी सुरू केल्या आहेत. भारतात ५जी नेटवर्कसोबतच क्लाऊड गेमिंग सेवा सुरू करण्याची तयारी या कंपन्यांनी चालविली आहे, असे सूत्रांनी सांगितले.