चेन्नई : विविध कारणांमुळे सरकारकडून इंटरनेट बंद केले जाते, त्यामुळे केवळ लोकांची वैयक्तिक अडचण होते असे नव्हे; तर अर्थव्यवस्थेलाही त्यामुळे मोठा फटका बसतो. २०१९ मध्ये केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या अशा आदेशामुळे देशाच्या विविध भागांत जवळपास ४,१९६ तास इंटरनेट बंद राहिले. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला १.३ अब्ज डॉलरचा फटका बसला.ब्रिटनस्थित ‘टॉप१०व्हीपीएन’ या तंत्रज्ञान संशोधन संस्थेने केलेल्या अभ्यासातून ही महत्त्वाची माहिती समोर आली. अशी बंदी सगळ्याच देशांमध्ये घातली जात असते. इंटरनेटबंदीचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांत भारताचा जगात तिसरा क्रमांक लागला. या बाबतीत इराक आणि सुदान हे संकटग्रस्त देशच भारताच्या पुढे आहेत. भारतातील जम्मू-काश्मीर, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि इतर काही प्रदेशांना इंटरनेटबंदीचा मोठा बसला. सुमारे ८.४ दशलक्ष इंटरनेट वापरकर्त्यांवर त्याचा परिणाम झाला.या अभ्यासात केवळ मोठ्या प्रदेशातील इंटरनेटबंदीचा आढावा घेण्यात आला आहे. छोट्या आणि स्थानिक पातळीवरील इंटरनेटबंदीचा समावेश अभ्यासात करण्यात आलेला नाही. ही माहिती जमेस धरल्यास त्यामुळे प्रत्यक्षातील नुकसान किती तरी पट अधिक असू शकते, असा दावा करण्यात आला आहे.‘टॉप१०व्हीपीएन’च्या अहवालाचे लेखक सॅम्युअल वूडहॅम्स आणि सायमन मिग्लियानो यांनी सांगितले की, भारतात २०१९ मध्ये आधीपेक्षा खूप जास्त प्रमाणात इंटरनेट बंद करण्यात आल्याच्या घटना घडल्या. इंटरनेटसेवेमध्ये येणाऱ्या अडथळ्यांबाबत आम्ही अभ्यास केलेल्या देशांत भारताएवढे अडथळे अजूनही अन्यत्र कोठे दिसून येत नाहीत. अडथळ्यांची ही संख्या आणि इंटरनेट बंद पडण्याचा कालावधी यात कपात करण्याचा प्रयत्न न झाल्यास भारतातील आर्थिक नुकसान आणखी वाढू शकते, असेही या अभ्यासात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)>काश्मिरात सर्वाधिकअहवालात म्हटले आहे की, २०१९ मध्ये भारतातील इंटरनेटबंदीच्या बहुतांश घटना या स्थानिक पातळीवरील आणि कमी कालावधीच्या होत्या. काश्मिरातील इंटरनेटबंदी मात्र सर्वाधिक परिणाम करणारी ठरली.
४,१९६ तास इंटरनेट बंद राहिल्यामुळे भारताला १.३ अब्ज डॉलरचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 2:58 AM