नवी दिल्ली – भारतीय उद्योग जगतात मागील २ दिवस अत्यंत वाईट गेलेत. या काळात सहारा ग्रुपचे प्रमुख सुब्रत रॉयसह ३ उद्योगपतींनी जगाचा निरोप घेतला आहे. सुब्रत रॉय, पीआरएस ओबेरॉय आणि बीकानेरवाला फाऊंडर केदारनाथ अग्रवाल यांचे निधन झाले आहे. सुब्रत रॉय यांचे मंगळवारी रात्री एका खासगी रुग्णालयात उपचारावेळी निधन झाले. अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांचे पार्थिव लखनौच्या सहारा शहर इथं घेऊन गेले आहेत. तिथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
सहारा समूहानं एक निवेदन जारी करत म्हटलंय की, सुब्रत रॉय हे हायपर टेन्शन आणि डायबिटीजसारख्या आजाराशी झुंज देत होते. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. १२ नोव्हेंबरला तब्येत बिघडल्याने मुंबईच्या कोकिलाबेन धीरुभाई रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले होते. सुब्रत रॉयनं लाखो गरीब आणि ग्रामीण भागातील लोकांना बँकिंग सुविधेशी जोडले होते. परंतु बाजार नियामक सेबीने जेव्हा त्यांच्याविरोधात कारवाई केली तेव्हापासून सहारा ग्रुप अडचणीत आला.
दुसरे उद्योगपती म्हणजे भारतातील हॉटेल इंडस्ट्रीजचा चेहरामोहरा बदलणारे पृथ्वीराज सिंह ओबेरॉय. ओबेरॉय ग्रुपचे मुख्य पृथ्वीराज सिंह ओबेरॉय यांचे मंगळवारी ९४ व्या वर्षी निधन झाले. मागील वर्षी त्यांनी ईआयएच लिमिटेडचे कार्यकारी अध्यक्ष आणि ईआयएच असोसिएटेड हॉटेल्स लि. चेअरमन पद सोडले होते. पृथ्वी राज सिंह ओबेरॉय यांचे शिक्षण यूके आणि स्विझरलँडमध्ये झाले. पीआरएस ओबेरॉय यांचे नाव देश परदेशात लग्झरी हॉटेल व्यावसायिकांमध्ये गणले जाते. २००८ मध्ये भारतात पीआरएस ओबेरॉय यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
दरम्यान, या २ उद्योगपतींशिवाय तिसरे मिठाई आणि स्नॅक्स ब्रँड बीकानेरवालाचे संस्थापक लाला केदारनाथ अग्रवाल यांचे सोमवारी निधन झाले. ते आपल्या भावासोबत बीकानेरहून १९५० मध्ये राजधानी दिल्लीत आले होते. केदारनाथ अग्रवाल यांचे वय ८६ वर्ष होते. काकाजी नावाने प्रसिद्ध केदारनाथ अग्रवाल यांच्या निधनाने एक युग संपले असं बीकानेरवाला समुहाकडून निवेदन देऊन सांगितले गेले. भारतात बीकानेरवाला यांची ६० हून अधिक दुकाने आहेत. त्याशिवाय अमेरिका, न्यूझीलंड, सिंगापूर, नेपाळ आणि संयुक्त अरब अमीरात या देशातही त्यांची आऊटलेट्स आहेत.