Join us

अधिक रोजगार निर्माण करण्यासाठी भारताला ८-८.८ टक्के जीडीपी वाढीची गरज : रघुराम राजन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 3:35 PM

जाणून घ्या काय म्हणाले रघुराम राजन.

भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) माजी गव्हर्नर रघुराम राजन (Raghuram Rajan) यांनी मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होण्यावर वक्तव्य केलं. मोठ्या संख्येने नोकऱ्या निर्माण करण्यासाठी भारताला ८ टक्क्यांहून अधिक जीडीपी वाढीची आवश्यकता आहे. बीजिंगमध्ये एका कार्यक्रमात व्हिडिओ लिंकद्वारे ते सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी यावर भाष्य केलं."आपल्या देशाची लोकसंख्या आणि येथील रोजगाराची गरज लक्षात घेता, ८-८.५ टक्के जीडीपी वाढीची गरज आहे, असं म्हणता येईल. जर आपण येथे रोजगाराच्या गरजेच्या संदर्भात बोललो तर ही वाढ देखील थोडी मंद दिसते, कारण आपल्याकडे मोठ्या संख्येने तरुण आहेत ज्यांना रोजगाराची गरज आहे," असं मत राजन यांनी यावेळी व्यक्त केलं.मुंबईची रिसर्च संस्था सेंटर फॉर मॉनिटरी इंडियन इकॉनॉमीनुसार भारताची जीडीपी ग्रोथ अन्य प्रमुख अर्थव्यवस्थांच्या तुलनेत अधिक आहे. परंतु लाखो-कोट्यवधी लोकांसाठी योग्य प्रमाणात रोजगार निर्माण करू शकत नाहीये. ऑक्टोबरमध्ये बेरोजगारीचा दर वाढून १०.०५ टक्क्यांवर गेला, जो गेल्या दोन वर्षांतील सर्वाधिक आहे. एचएसबीसीच्या अंदाजानुसार भारताला पुढील १० वर्षांत ७ कोटी नवे रोजगार उपलब्ध करून देण्याची गरज भासेल आणि ७.५ टक्क्यांच्या वाढीसह याद्वारे केवळ दोन तृतीयांश रोजगाराची समस्याच सुटेल, असंही स्पष्ट करण्यात आलंय.वाढता बेरोजगारीचा दर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी चिंतेचा विषय ठरण्याची शक्यात आहे, कारण ते लवकरच दुसरा कार्यकाळ पूर्ण करणार आहेत. मोदी सरकार याचा सामना करण्याचे प्रयत्न करत आहे. सरकारनं या वर्षाच्या अखेरीस १० लाख नवे रोजगार निर्माण करण्याचं आश्वासन दिलंय.उत्तम प्रशिक्षणाची गरजमॅन्युफॅक्चरिंग प्रकरणी अग्रस्थानी असलेले देश म्हणजेच चीन, व्हिएतनाम सारख्या देशांशी स्पर्धा करण्यासाठी भारताला आपल्या वर्कफोर्सला उत्तम प्रशिक्षण द्यावा लागणार आहे. त्यांनी आयफोनच्या पार्ट्सच्या उत्पादनाचाही हवाला दिला. भारत व्हॅल्यू चेनला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे आणि काही संकेत पाहायला मिळत आहे. परंतु भारताला संपूर्ण स्मार्टफोन तयार करण्यासाठी अद्यापही वेळ लागणार असल्याचं त्यांनी म्हटलं.

टॅग्स :रघुराम राजनअर्थव्यवस्था