90 Hour Workweek Debate : कामाचे तास किती असावेत? यावरुन देशात काही महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. याची सुरुवात इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांच्या वक्तव्याने झाली. तरुणांनी आठवड्यातून ७० तास काम करावे असा सल्ला त्यांनी दिला होता. यानंतर लार्सन आणि टुब्रो कंपनीचे अध्यक्ष एसएन सुब्रह्मण्यन यांनी तर हद्दच केली. घरी बायकोचे तोंड किती वेळ पाहणार म्हणून ९० तास काम करण्याचे समर्थन केले. यावरुन त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. हा वाद शमत नाही तोच, आता नीती आयोगाचे माजी सीईओ अमिताभ कांत यांनी यासंदर्भात मत व्यक्त केले आहे. बिझनेस स्टँडर्डच्या 'मंथन समिट'मध्ये कांत बोलत होते.
आपल्या वक्तव्याचं समर्थन करताना अमिताभ कांत यांनी त्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले की २०४७ पर्यंत ३० ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारतीयांनी कठोर परिश्रम केले पाहिजेत. जपान, दक्षिण कोरिया आणि चीन या देशांनी मजबूत कामाच्या धोरणांमुळे आर्थिक यश मिळवले आहे. भारताने जागतिक दर्जाची अर्थव्यवस्था होण्यासाठी अशीच मानसिकता विकसित करायला हवी, असे त्यांनी सुचवले.
पुढे कात म्हणाले, “माझा कठोर परिश्रमावर विश्वास आहे. आठवड्याचे ८० तास असो किंवा ९० तास भारतीयांनी कठोर परिश्रम केलेच पाहिजेत. जर देशात अर्थव्यवस्था ४ ट्रिलियन डॉलरवरुन ३० ट्रिलियन डॉलर करायची आपली महत्त्वाकांशा असेल तर कष्टाला पर्याय नाही. हे कुठल्या काल्पनिक चित्रपटातील कथानकाप्रमाणे करुन उपयोग नाही.
सध्या भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार सुमारे ४,००० अब्ज डॉलर्स इतका आहे. सध्या जास्त मेहनत करायची नाही, हे बोलणे फॅशन झाली आहे. भारताने जागतिक दर्जाच्या उत्कृष्टतेसह प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम केले पाहिजेत. जर वेळेचे योग्य व्यवस्थापन केले तर तुम्हाला वैयक्तित आयुष्यात पुरेसा वेळ मिळू शकतो. भारतीयांनी वेळ आणि खर्चाचा अतिरेक न करता जागतिक दर्जाच्या उत्कृष्टतेने प्रकल्प पूर्ण करण्याची कला शिकली पाहिजे.