Join us

"चिप निर्मितीसाठी अब्जो डॉलर्सची सब्सिडी देणं आणि दुसरीकडे रोजगार देणारी..," रघुराम राजन यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 1:06 PM

भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी चिप उत्पादनावर भारताच्या अब्जावधी डॉलर्स खर्च करण्यावरून जोरदार टीका केली आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी चिप उत्पादनावर भारताच्या अब्जावधी डॉलर्स खर्च करण्यावरून जोरदार टीका केली आहे. या चिप बनवणाऱ्या कंपन्यांना सबसिडी देण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत आणि दुसरीकडे रोजगार निर्माण करणारी अनेक क्षेत्रे चांगली कामगिरी करत नाहीत, त्यांच्याकडे कोणीही लक्ष देत नाही, असं म्हणत राजन यांनी टीकेचा बाण सोडला. 

जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीत 'मेकिंग इंडिया अॅन अॅडव्हान्स्ड इकॉनॉमी बाय २०४७ : व्हॉट विल टेक इट' या कॉन्फरन्सदरम्यान त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. "मला वाटते की लोकशाहीकडून फायदा घेण्याची वेळ आली आहे, परंतु समस्या ही आहे की त्याचा लाभ घेत नाही," असं रघुराम राजन म्हणाले. उपलब्ध नोकऱ्यांचं स्वरूप बदलण्यासाठी आपल्याला काही प्रमाणात आपल्याकडे असलेल्या लोकांच्या क्षमता वाढवण्याची गरज आहे. दोन्ही आघाड्यांवर काम करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. 

चिप निर्मितीवर टीका 

राजन यांनी चिप उत्पादनावर भारतानं अब्जावधी डॉलर्स खर्च करण्यावरून टीका केली. या चिप कारखान्यांचा विचार करा. चिप उत्पादनासाठी अनेक अब्जावधींची सबसिडी मिळणार आहे. दुसरीकडे, चामड्यासारखे अनेक रोजगार-केंद्रित क्षेत्र चांगले काम करत नाहीत. आपण अनेक क्षेत्रात खाली जात आहोत. आपल्याकडे नोकरीची समस्या अधिक आहे यात आश्चर्य नाही. गेल्या १० वर्षांत नोकरीची समस्या निर्माण झाली आहे, असं नाही. गेल्या काही दशकांपासून त्यात वाढ होत असल्याचं ते म्हणाले.  

'रोजगार सधन क्षेत्रांकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही' 

रोजगार सधन क्षेत्रांकडे दुर्लक्ष होत असेल तर ते योग्य नाही. चर्म उद्योगाला आता सबसिडी देण्याची गरज आहे, असं मी म्हणत नाही, परंतु तेथे काय चूक होत आहे ते शोधून त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे," असंही रघुराम राजन यांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :रघुराम राजनअर्थव्यवस्थाभारत