Join us

4 जी मोबाईल मार्केटमध्ये भारत अमेरिकेला मागे टाकणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2017 6:18 PM

जागतिक 4 जी मोबाईल मार्केटिंगमध्ये भारत अमेरिकेला मागे टाकणार असे मोबाईल मार्केटमध्ये बोलले जात आहे. 

नवी दिल्ली, दि. 28 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला डिजिटल बनविण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे टेलिकॉम आणि स्मार्टफोन इंडस्ट्रीत मोठ्याप्रमाणात बदल होत आहेत. मोबाईल मार्केटमध्ये अनेक कंपन्यांनी एकापेक्षा एक स्वस्त प्लॅन बाजारात आणून ग्राहकांवर एकप्रकारे पाऊस पाडत आहेत. या प्लॅनमुळे ग्राहकचं कोणता प्लॅन घ्यावा, या संभ्रमात पडले आहेत. मात्र, या सगळ्यामुळे 2 जीचा वापर करणा-या लोकांना 4 जी च्या युगात आणून ठेवले. तसेच, रिलायन्स जिओने 4 जी मोबाईल बाजारात आणल्यामुळे ग्राहकांमध्ये मोठ्याप्रमाणात 4 जीचा वापर लोकांकडून होताना दिसून येत आहे. जागतिक 4 जी मोबाईल मार्केटिंगमध्ये भारत अमेरिकेला मागे टाकणार असे मोबाईल मार्केटमध्ये बोलले जात आहे. 

काउंटरपॉंईटच्या अहवालानुसार, भारतात मोबाईल डाटा वापर करणा-यांची संख्या दिवसेंदिवस मोठ्याप्रमाणात वाढत आहे. येत्या काही दिवसात भारत अमेरिकेला पाठिमागे टाकेल आणि जगात मोबाईल मार्केटिंगमध्ये दुस-या क्रमाकांवर असेल. 34 कोटी लोक 4 जी मोबाईलचा वापर करतील आणि जगभरातील सर्वात मोठे मोबाईल मार्केटमध्ये स्थान मिळेल. सध्या भारतात 15 कोटी लोक 4 जी मोबाईलचा वापर करतात.  दरम्यान, अमेरिकेत सध्या 4 जी मोबाईल मार्केट 22.5 कोटींच्या आसपास आहे, ते वाढून 24.5 कोटी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे भारतीतल वृद्धीदर अमेरिकेच्या तुलनेत जास्त आहे. तर, चीनमध्ये 74 कोटींच्या मोबाईलचा वापर करतात, हा आकडा पुढील वर्षी वाढून 78 कोटींपर्यंत जाईल, असा अंदाज या अहवालानुसार वर्तविण्यात आला आहे. 

दुसरीकडे, गेल्या काही दिवसांपूर्वी टेलिकॉम रेग्युलेशन अॅथॉरिटी ऑफ इंडियाने (TRAI) दिलेल्या माहितीनुसार भारतात सध्या अंदाजे 100 कोटी मोबाईलचा वापर करत आहेत. 100 कोटी मोबाईल फोन वापरणा-यांपैकी 30 टक्के म्हणजेच 30 कोटी लोकांजवळ स्मार्टफोन आहे. मोबाईल फोनसोबत टॅब्लेटची मागणी आणि वापर वाढत आहे. मात्र ग्राहकांची टॅब्लेटची मागणी गेल्या काही दिवसांमध्ये कमी होत चालली आहे. टॅब्लेट डिमांडमध्ये 3.3 टक्क्यांची घट झाली आहे. तर व्यवहारिक वापरासाठीची मागणी 6.9 टक्क्यांनी वाढली आहे.  2022 पर्यंत जगभरात एकूण 550 कोटी मोबाईल डिव्हाईस उपलब्ध असतील, आणि भारतामध्ये सर्वात जास्त मोबाईल युजर्स असणार आहेत.  

भारतात लँडलाईन वापरणा-यांची संख्या 2.53 कोटी आहे. तर दूरसंचार वापरकर्त्यांची आकडेवारी 104 कोटींवर पोहोचली आहे.  जानेवारी महिन्यात 70 लाख लोकांनी दूरसंचार वापरास सुरुवात केली. एअरटेलने सर्वात जास्त 25 लाख ग्राहक जोडले आहेत. तर आयडीयाने 12.51 लाख आणि वोडाफोनने 11.12 लाख ग्राहक जोडले आहेत. बीएसएनएल चौथ्या क्रमांकावर असून 9.25 लाख ग्राहक जोडले गेले. टेलिनोरने 7.24 लाख, एअरसेलने 4.35 लाख आणि रिलायन्स कम्युनिकेशनने 3.15 लाख नवे ग्राहक जोडले आहेत.