ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 17- आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रविवारी होणाऱ्या भारत विरूद्ध पाकिस्तान या फायनल मॅचवर तब्बल दोन हजार कोटी रूपयांचा सट्टा लागला आहे. युकेमध्ये सट्टा लावायला कायदेशीर परवानगी आहे, त्यामुळे सट्टे बाजार तेजीत आला आहे. रविवारी भारत आणि पाकिस्तान हे दोन्हीही संघ चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपलं नाव कोरण्यासाठी खेळणार आहे. ऑल इंडिया गेमिंग फेडरेशननुसार या हाय प्रोफाइल मॅचवर तब्बल 2 हजार कोटी रूपयांचा सट्टा लावण्यात आला आहे. द टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे.
या सट्ट्यामध्ये सट्टा लावणाऱ्यांची सगळ्यात जास्त पसंती भारतीय संघाला आहे. उदाहरणार्थ, टीम इंडियावर एखाद्या व्यक्तीने 100 रूपये लावले आणि जर टीम इंडिया जिंकली तर त्या 100 रूपये लावणाऱ्या व्यक्तीला 147 रूपये परत मिळणार आहेत. पण जर पाकिस्तानची टीम जिंकली तर 100 रूपयांच्या जागी त्या व्यक्तीला 300 रूपये मिळणार आहेत. अशा प्रकारचा सट्टा सध्या सट्टेबाजारात सुरू आहे.
"काही तज्ज्ञांच्या अभ्यासानूसार, भारतीय संघ या वर्षभरात जितके सामने खेळला आहे त्या सामन्यांवर एकुण मिळून 2 लाख करोड रूपयांचा सट्टा लागला होत. आता 10 वर्षानंतर एका महत्त्वाच्या ट्रॉफीसाठी भारत-पाकिस्तान हे दोन संघ फायनलमध्ये समोरासमोर आहेत, म्हणूनच सट्टेबाजारात बाढ झाली आहे, असं मत एआयजीएफचे सीईओ रॉलँड लँडर्स यांनी व्यक्त केलं आहे.
भारत-पाकिस्तानच्या सामन्यावरील सट्टा वेगळा असेल तसंच कोण जिंकणार आणि कोण हारणार या निर्णयावरचा सट्टा वेगळा आहे. याव्यतिरिक्त सामना सुरू असताना इतर अनेक मुद्द्यांवर सट्टा लावला जाणार आहे. सामना सुरू झाल्यावर पहिल्या 10 ओव्हर्समध्ये दोन्ही टीम किती धावा करतील, यावरसुद्धा सट्टेबाजारात सट्टा लावला जाणार जाईल. इतकंच नाही, तर हाफ सेंच्युरी किंवा सेंच्युरी कोण करणार, जास्त विकेट कोणाला मिळतील, अशा विविध भागांवर चट्टा चालतो.
"खरंतर देशभरात सट्टा लावणं बेकायदेशीर आहे पण भारतीय नागरिक युकेच्या वेबसाइट्सवर इंटरनॅशनल क्रेडिट कार्ड आणि ई-वॉलेटच्या माध्यमातून सट्टा लावू शकतात, असं रॉलँड लँडर्स म्हणाले आहेत.