इस्लामाबाद : भारत आणि पाकिस्तान या आशिया खंडातील एकमेकांचे शेजारी असलेल्या देशांमधील व्यापार वार्षिक ३७ अब्ज डॉलरपर्यंत नेला जाऊ शकतो, असे मत जागतिक बँकेच्या एका अहवालात मांडण्यात आले आहे. बँकेने या अहवालात म्हटले आहे की, या दोन्ही देशांमध्ये सध्या असलेल्या तणावामुळे व्यापार संबंध सामान्य होऊ शकलेले नाहीत. दोन्ही देशांत सहकार्याच्या मार्गातही अनेक अडथळे येत आहेत.जागतिक बँकेने ‘ए ग्लास हाफ फुल : द प्रॉमिस आॅफ रीजनल ट्रेड इन साउथ एशिया’ हा अहवाल नुकताच जारी केला. या अहवालात म्हटले आहे की, भारत आणि पाकिस्तान दरम्यान द्विपक्षीय व्यापारामध्ये निर्बंध असलेल्या उत्पादनांची मोठी यादी हा प्रमुख अडथळा ठरत आहे. भारत आणि पाकिस्तानने संवेदनशील उत्पादनांची एक यादीच तयार केलेली आहे. या उत्पादनांवरील शुल्कात हे देश कोणतीही सूट देत नाहीत.भारत, पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या बाबतीत अशा प्रकारच्या संवेदनशील उत्पादनांच्या यादीत एकूण ६४ प्रकारची उत्पादने आहेत, अहवालात म्हटले आहे की, पाकिस्तान अटारी-वाघा रस्त्याच्या मार्गाने १३८ उत्पादनांना देशात येऊ देण्याची परवानगी देतो.निर्बंध असलेली उत्पादने मुख्य अडचण‘डॉन’ने या अहवालाच्या हवाल्याने म्हटले आहे की, दोन्ही देशांतील व्यवसायिक संबंध सामान्य नसल्याने व्यापाराच्या विस्तारात अडचणी येत आहेत. निर्बंध असलेल्या पाकिस्तानच्या यादीत ९३६ तर भारताच्या यादीत २५ प्रकारची उत्पादने आहेत. यात अल्कोहोल आणि अन्य उत्पादनांचा समावेश आहे.
भारत-पाकिस्तानचा व्यापार जाऊ शकतो ३७ अब्ज डॉलर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 6:12 AM