मुंबई : टपाल खात्याची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेला (आयपीपीबी) मुंबईत चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. मुंबई विभागात राबविण्यात आलेल्या महालॉगिन कार्यक्रमाअंतर्गत अवघ्या चार दिवसांत मुंबईत एक लाख ४२ हजार ५०० नवीन खाती सुरू करण्यात आली आहेत. मुंबई विभागाच्या पोस्टमास्टर जनरल स्वाती पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील ६ डिव्हिजनमध्ये राबविण्यात आलेल्या या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. बँकिंग क्षेत्रापासून वंचित असलेल्या नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे ध्येय पोस्टमनच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा विश्वास पांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.मुंबईतील ६ डिव्हिजनमध्ये १८०६ पोस्टमन व इतर टपाल कर्मचाऱ्यांनी नवीन खाती उघडण्यास सहकार्य केले. रेल्वे स्थानकाच्या बाहेरील परिसरात याबाबत माहिती देणारी व खाती उघडणारी केंद्रे तयार करण्यात आली होती. केवळ आधार कार्ड क्रमांक सांगून अवघ्या १०० रुपयांपासून खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध असल्याने अनेकांनी या योजनेचा लाभ घेतला. कर्मचाऱ्यांनीदेखील सायंकाळी उशिरापर्यंत काम केले.मुंबई विभागात आयपीपीबीची सुमारे अडीच लाख खाती आतापर्यंत उघडली आहेत. या खात्यांमध्ये बचत करण्याची कमाल मर्यादा १ लाख रुपये आहे. जास्तीतजास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा व त्यांची खाती उघडण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे पांडे यांनी सांगितले.>डिजिटल व्यवहार करणे शक्यआयपीपीबीच्या माध्यमातून ग्राहकांना डिजिटल आर्थिक व्यवहार सहजपणे करणे शक्य होतात व सर्व प्रकारची पेमेंट करता येतात. त्याशिवाय ज्या ग्राहकाचे दुसºया बँकेत खाते असेल व ते आधार कार्डशी संलग्न केलेले असल्यास दोन्ही खात्यांमध्ये आॅनलाइन आर्थिक व्यवहार करणे शक्य होणार आहे.
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची चार दिवसांत सुमारे दीड लाख खाती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2020 6:25 AM