जर तुम्ही पोस्टाच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे (India Post Payments Bank) ग्राहक असाल तर तुमच्यासाठी वाईट बातमी आहे. १ जानेवारीपासून या बँकेच्या खातेधारकांना एका लिमिटपेक्षा जास्त पैसे काढणे आणि भरल्यास शुल्क आकारले जाणार आहे. यामुळे सामान्य ग्राहकांना भुर्दंड बसणार आहे.
आयपीपीबी ही पोस्टाची बँक आहे. बँकेने दिलेल्या माहितीनुसार बेसिक सेव्हिंग्स अकाऊंटमधून दर महिन्याला चार पेक्षा जास्त वेळा पैसे काढले तर प्रत्येक व्यवहाराला कमीतकमी २५ रुपयांचे शुल्क आकारले जाणार आहे. म्हणजे चारवेळा पैसे काढल्यास कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
याचबरोबर तुम्ही इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत बेसिक सेव्हिंग (IPPB Basic Saving Account) किंवा करंट अकाऊंटमध्ये महिन्याला १०००० रुपयेच नि:शुल्क भरू शकणार आहात. त्यापेक्षा जास्त पैसे भरले तर ग्राहकांना अतिरिक्त चार्ज द्यावा लागणार आहे. पैसे भरतानाचे किंवा काढतानाचे शुल्क हे तुम्ही काढत किंवा भरत असलेल्या रकमेच्या कमीतकमी २५ रुपये ते ०.५० टक्के असणार आहे. १ जानेवारीपासून हा नवा नियम लागू होणार असून सामान्यांना नवा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
तुमचे या पोस्टाच्या बँकेत सेव्हिंग अकाऊंट (IPPB Saving Account) परंतू जे बेसिक नाही ते असेल तर तुम्ही दर महिन्याला २५००० रुपये मोफत काढू शकणार आहात. यानंतर मात्र, तुम्हाला ०.५० टक्के प्रमाणे शुल्क द्यावे लागणार आहे. यानंतर १०० रुपये जरी काढले तरी तुम्हाला कमीत कमी चार्ज २५ रुपये सोसावा लागणार आहे.