Join us

आर्थिक स्वातंत्र्य सूचीत भारत १४३व्या स्थानावर

By admin | Published: February 17, 2017 12:41 AM

आर्थिक स्वातंत्र्याच्या वार्षिक सूचीत भारताची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. भारत थेट १४३व्या स्थानावर पोहोचला आहे.

वॉशिंग्टन : आर्थिक स्वातंत्र्याच्या वार्षिक सूचीत भारताची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. भारत थेट १४३व्या स्थानावर पोहोचला आहे. अमेरिकेतील ‘द हेरिटेज फाउंडेशन’च्या ‘इंडेक्स आॅफ इकॉनॉमिक फोरम’मध्ये भारताची क्रमवारी शेजारी देश पाकिस्तानसह अनेक दक्षिण आशियाई देशांपेक्षा मागे आहे. आर्थिक सुधारणांच्या प्रगतीत समानता नसल्याने ही क्रमवारी घसरल्याचे सांगितले जात आहे. या अहवालात म्हटले आहे की, भारतात गत पाच वर्षांत सरासरी सात टक्क्यांनी वृद्धी झाली आहे. पण, ही वृद्धी धोरणांच्या मुळापर्यंत पोहोचू शकली नाही. ज्यामुळे आर्थिक स्वातंत्र्याचे संरक्षण केले जाऊ शकेल. कंजरव्हेटिव्ह पोलिटिकल विचारसरणीच्या या अहवालात म्हटले आहे की, भारताला मुख्यत: पराधीन अर्थव्यवस्थेच्या श्रेणीत ठेवले आहे. कारण, भारतात बाजारपेठेवर आधारित प्रगती असमान आहे. या सूचीत हाँगकाँग, सिंगापूर आणि न्यू झीलँड आघाडीवर आहेत. दक्षिण आशियाई देशांच्या यादीत भारतापेक्षा खालच्या क्रमांकावर अफगाणिस्तान १६३ व मालदीव १५७व्या स्थानावर आहेत. तर, नेपाळ १२५, श्रीलंका ११२, पाकिस्तान १४१, भूतान १०७ व बांगलादेश १२८व्या स्थानावर आहेत. चीनने या यादीत ५७.४ अंक मिळविले आहेत. मागच्या वर्षाच्या तुलनेत ते ५.४ अंकांनी जास्त आहेत. या वर्षी त्यांचे स्थान १११वर आहे. अमेरिका ७५.१ अंकांनी १७व्या स्थानावर आहे. या सूचीचा सरासरी स्कोअर ६०.९ अंक आहे.