Join us  

डाउनलोड स्पीडमध्ये भारत ९६व्या क्रमांकावर

By admin | Published: December 24, 2016 1:22 AM

कॅशलेस आर्थिक व्यवहार सहजपणे होण्यासाठी चांगला व सलग इंटरनेट स्पीड आणि सायबर सुरक्षा यांची गरज असते.

नवी दिल्ली : कॅशलेस आर्थिक व्यवहार सहजपणे होण्यासाठी चांगला व सलग इंटरनेट स्पीड आणि सायबर सुरक्षा यांची गरज असते. सध्या केंद्र सरकारकडून डिजिटल आर्थिक व्यवहार करण्यावर भर देण्याचे आवाहन सातत्याने केले जात आहे. मात्र डाउनलोड स्पीडमध्ये भारताचा ९६वा क्रमांक लागतो आणि सरासरी बॅण्डविड्थ उपलब्धतेत १0५व्या क्रमांकावर आहोत, ही वस्तुस्थिती असून, गेल्या काही काळापासून ही परिस्थितीही बिघडत चालली आहे. डाउनलोड स्पीडमध्ये भारताचा क्रमांक नेपाळ आणि बांगलादेशच्या खाली असून, सायबर हल्ल्यांमध्ये मात्र आपण वरच्या स्थानावर आहोत. बँकांच्या आणि संवेदनशील, गुपित माहितीवर भारतात सहज डल्ला मारला जातो. भारतामधील या परिस्थितीमुळे युजर्स आणि सायबर क्षेत्रातील तज्ज्ञ दोघेही चिंतित आहेत. सायबर क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते हॅकिंगमुळे आपली वैयक्तिक माहिती चोरली जाईल, या भीतीने भारतातील लोक सायबर व्यवहार करायला घाबरतात. अशा वेळी बँक आणि पोलीस कारवाई करण्याऐवजी हतबलता दाखवतात, असेही आढळून आले आहे. सायबरतज्ज्ञ असलेले विजय मुखी यांनी माझ्यासारखी व्यक्तीही आॅनलाइन व्यवहार करायला घाबरते, असे म्हटले आहे. आॅनलाइन व्यवहार सुरक्षित व्हावा यासाठी सरकारकडूनच काही पावले उचलण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सायबर हल्ल्यात भारताचा सहावा क्रमांक लागतो. केवळ एका वर्षात भारतामध्ये सायबर हल्ले दुपटीने वाढले आहेत. बॅण्डविड्थच्या उपलब्धतेविषयी बोलायचे झाल्यास, श्रीलंका, चीन, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया, मलेशिया यांसह अनेक देश आपल्यापेक्षा खूप पुढे आहेत. सायबरतज्ज्ञांनी डिजिटल व्यवहाराचे स्वागत करतानाच, माहिती व तंत्रज्ञानाबाबत मिळणाऱ्या पायाभूत सुविधा आणि शिक्षणावरून नाराजी व्यक्त केली आहे. कार्डद्वारे व्यवहार केला जातो, तेव्हा कोणीही आपला पिन क्रमांक किंवा ओटीपी कोणाला देऊ नये. लोक बोगस फोन करून बँक किंवा सुरक्षेच्या कारणास्तव माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यांना कोणतीही माहिती देता कामा नये. तसेच कार्ड स्वाइप केले जाते, तेव्हा स्वत: तिथे उपस्थित राहा, असे नागपूरचे पोलीस उपायुक्त (सायबर क्राइम) सचिन पाटील यांनी म्हटले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

सुरक्षित उपाय करा :भारतात वाढलेल्या सायबर हल्ल्यांपासून वाचण्यासाठी ई-कॉमर्स कंपन्यांनी सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात. डिजिटल व्यवहार वाढल्याने सायबर गुन्हेगारी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षितता बाळगण्याचे आवाहन गृहमंत्रालयाने केले आहे.