Time Magazine : अमेरिकेतील टाइम मासिकाने (Time Magazine) 2024 मधील जगातील सर्वात प्रभावशाली कंपन्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत तीन भारतीय कंपन्यांनी स्थान मिळवले आहे. टाईमच्या 100 प्रभावशाली कंपन्यांमध्ये स्थान मिळवणाऱ्या भारतीय कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि टाटा समूहाचा समावेश आहे.
टाईम मासिकाने ही यादी 5 श्रेणींमध्ये तयार केली असून, त्यात लीडर्स, डिसप्टर्स, इनोव्हेटर्स, टायटन्स आणि पायोनियर्स यांचा समावेश आहे. रिलायन्स आणि टाटा समूहाला टायटन्स श्रेणीमध्ये स्थान देण्यात आले आहे, तर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला पायोनियर्स श्रेणीमध्ये स्थान देण्यात आले आहे. या पाच श्रेणींमध्ये 20 कंपन्यांचा समावेश आहे.
भारताचा जगरनॉट
टाईम मासिकाने रिलायन्स इंडस्ट्रीजला 'इंडियाज जगरनॉट' ही पदवी दिली आहे. ही यादी शेअर करताना टाईम मासिकाने रिलायन्सबद्दल लिहिले की, रिलायन्सने कापड आणि पॉलिस्टर कंपनी म्हणून सुरुवात केली आणि आज जगातील शीर्ष कंपन्यांमध्ये स्थान मिळवले आहे. सध्या मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स इंडस्ट्रीज आज ऊर्जा, रिटेल आणि टेलिकॉमसह अनेक व्यवसाय करते. टाईम मासिकानेही आपल्या अहवालात रिलायन्स आणि डिस्ने यांच्यातील 8.5 अब्ज डॉलरच्या कराराचा उल्लेख केला आहे. तसेच, ही भारतातील सर्वात मौल्यवान कंपनी असल्याचे म्हटले.
या यादीत टाटा आणि सिरम इन्स्टिट्यूटचाही समावेश
टाइमच्या या यादीत टाटा समूहाचाही समावेश आहे. ही भारतातील सर्वात जुन्या कंपन्यांपैकी एक आहे. टाटा समूहाच्या पोर्टफोलिओबद्दल बोलायचे तर ते स्टील, सॉफ्टवेअर, घड्याळे, केबल्स, मीठ, धान्य, किरकोळ, इलेक्ट्रॉनिक्स, पॉवर, मोटार वाहने, फॅशन आणि हॉटेल्स, टेक, एआय आणि सेमीकंडक्टर क्षेत्रातपर्रंयत विस्तारलेली आहे. टाईम मॅगझिनने आपल्या यादीत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचाही समावेश केला आहे. ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. सीरम दरवर्षी 3.5 अब्ज डोस तयार करते. कोविडदरम्यान, कंपनीने करोडो लोकांसाठी लसीचे डोस तयार केले होते.