Join us

भारताचे गव्हर्नर ठरले जगात भारी; शक्तिकांत दास यांना मिळाला सर्वोत्तम गव्हर्नर पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 9:34 AM

कमालीचा राजकीय दबाव आणि आर्थिक संकटांतून दास यांनी चतुराईने मार्ग काढला, असे ‘इंटरनॅशनल सेंट्रल बँकिंग’ने दास यांचा गौरव करताना म्हटले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी  दिल्ली: भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तिकांत दास यांना ‘इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिसर्च जर्नल सेंट्रल बँकिंग’ने २०२३ या वर्षाचा ‘गवर्नर ऑफ द ईयर’ हा पुरस्कार दिला आहे. कठीण कालखंडात रिझर्व्ह बँकेचे यशस्वी नेतृत्व केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. युक्रेनच्या नॅशनल बँकेला ‘सेंट्रल बैंक ऑफ द ईयर’ हा पुरस्कार देण्यात आला आहे.

शक्तिकांत दास यांना आपल्या कार्यकाळात अनेक कठीण आव्हानांचा सामना करावा लागला. ‘आयएलअँडएफएस’च्या दिवाळखोरीपासून कोविड-१९ साथीपर्यंतच्या आव्हानांचा त्यात समावेश आहे. त्यातच रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्यामुळे नव्या समस्या निर्माण झाल्या. या सर्वांचा त्यांनी यशस्वी मुकाबला केला. त्यांनी रिझर्व्ह बँकेत मूलभूत सुधारणा लागू केल्या. अत्याधुनिक पेमेंट सिस्टिमची सुरुवात केली. साथकाळात वृद्धीला पाठबळ देणाऱ्या उपाययोजना केल्या.

का मिळाला पुरस्कार?

- कमालीचा राजकीय दबाव आणि आर्थिक संकटांतून दास यांनी चतुराईने मार्ग काढला, असे ‘इंटरनॅशनल सेंट्रल बँकिंग’ने दास यांचा गौरव करताना म्हटले आहे. 

- हा पुरस्कार जिंकणारे दास हे दुसरे भारतीय गव्हर्नर आहेत. याआधी २०१५ मध्ये तत्कालीन गव्हर्नर रघुराम राजन यांना हा पुरस्कार मिळाला होता.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकशक्तिकांत दास