लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : आगामी १० ते १२ वर्षांच्या काळात भारत उच्च मध्यमवर्ग उत्पन्न श्रेणीत पोहोचेल, असा अंदाज मानक संस्था ‘इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्च’ने जारी केलेल्या एका अहवालात म्हटले आहे.
जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे की, वित्त वर्ष २०३३ ते २०३६ यादरम्यान भारताचे दरडोई उत्पन्न ४,४६६ ते १३,८४५ डॉलर इतके होईल. त्याबरोबर भारताचा समावेश उच्च मध्यमवर्गाच्या श्रेणीत होईल. वित्त वर्ष २०४३ ते २०४७ यादरम्यान भारतीय अर्थव्यवस्था १५ लाख कोटी डॉलरची होईल, असेही यात म्हटले आहे.
वृद्धिदर हवा ९.७ टक्के
- अहवालात म्हटले आहे की, वित्त वर्ष २०४७ पर्यंत ३० लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था बनायचे असेल, तर वित्त वर्ष २०२४ ते २०४७ या कालावधीत भारताला वार्षिक ९.७ टक्के वृद्धी दर गाठावा लागेल.
- २०४७ पर्यंत ३० लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट गाठणे सोपे नाही. मानक संस्था क्रिसिलनेही अलीकडेच भारत उच्च मध्यमवर्ग उत्पन्न श्रेणीतील देश बनेल, असे म्हटले होते.
- अर्थव्यवस्था दुपटीने वाढून ७ लाख कोटी डॉलरची होईल, असेही म्हटले होते. २०२४ मध्ये अर्थव्यवस्था ३.६ लाख कोटी डॉलरची आहे.