Join us  

India-Russia Trade: अमेरिकेचा दबाव झुगारुन रशियन तेलाची आयात, मे महिन्यात 30 लाख मीट्रिक टन तेलाची खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2022 2:37 PM

India-Russia Trade: एकीकडे अनेक देशांनी रशियावर निर्बंध लादले असताना, दुसरीकडे भारत रशियाकडून सातत्याने कच्चे तेल खरेदी करत आहे.

India-Russia Trade: गेल्या काही महिन्यांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे जगातील बहुतांश देश रशियावर राजकीय आणि आर्थिक निर्बंध लादत आहेत. पण, भारत मात्र रशियाच्या सोबत असल्याचे दिसत आहे. या युद्ध काळातही भारत रशियाकडून तेलाची आयात सातत्याने वाढवत आहे. वित्तीय बाजार आणि पायाभूत सुविधांशी संबंधित डेटा प्रदान करणार्‍या यूएस-ब्रिटिश प्रदाता रेफिनिटिवच्या(Refinitiv) अंदाजानुसार, मे महिन्यात रशियाकडून भारताची कच्च्या तेलाची आयात 30.36 लाख मेट्रिक टनांवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी रशियातून भारतात आलेल्या 382,500 मेट्रिक टन क्रूडच्या मासिक सरासरीपेक्षा हे नऊ पट जास्त आहे.

अनेक देशांची रशियावर बंदीRefinitiv नुसार, युक्रेनवर हल्ला झाल्यापासून भारताने रशियाकडून 40.8 लाख मेट्रिक टन तेल घेतले आहे. रशियाचे युरल्स ऑइल सध्या सुमारे $95 प्रति बॅरलने तेल विकत आहे. दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाची किंमत प्रति बॅरल 119 डॉलर आहे. रशियावर निर्बंध जाहीर न केलेल्या देशांपैकी भारत एक आहे. ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, कॅनडा यासह अनेक पाश्चिमात्य देशांनी आधीच रशियन कच्च्या तेलाच्या आयातीवर बंदी घातली आहे, तर रशियानेच अनेक देशांना अटींची पूर्तता न केल्यामुळे पुरवठा थांबवला आहे. त्यामुळे जगभरात तेल आणि वायूच्या किमतीत प्रचंड वाढ झाली. यात कपात करण्यासाठी रशियाने आपले तेल आणि वायू स्वस्त दरात विकण्यास सुरुवात केल्यामुळे भारतासह अनेक देशांनी याचा फायदा घेतला आहे.

सरकारी तेल कंपन्यांकडून खरेदीभारताच्या सरकारी मालकीच्या तेल कंपन्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि मंगलोर रिफायनरी यांनी रशियन कच्चे तेल खरेदी केले आहे. भारत पेट्रोलियमने ट्रॅफिगुरा या व्यापाऱ्याकडून 2 दशलक्ष बॅरल रशियन तेल खरेदी केले आहे. भारत पेट्रोलियम नियमितपणे कोची रिफायनरीसाठी 310,000 बॅरल प्रतिदिन दराने कच्चे तेल खरेदी करत आहे. तर, भारत पेट्रोलियमने मे महिन्यात 2 दशलक्ष बॅरल रशियन क्रूड खरेदी केले आहे. इंडियन ऑइलनेही 24 फेब्रुवारीपासून रशियाकडून 6 दशलक्ष बॅरलहून अधिक तेल खरेदी केले आहे. याशिवाय भारतीय खाजगी रिफायनरी नायरा एनर्जीदेखील तेल खरेदी करत आहे.

भारतात 80 टक्के तेल आयात आकडेवारीनुसार, भारत आपल्या गरजेच्या 80 टक्के तेल आयात करतो. यामध्ये केवळ दोन ते तीन टक्के तेल रशियाकडून घेतले जाते. यंदा तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत भारत रशियाकडून सवलतीच्या दरात तेल खरेदी वाढवत आहे. Refinitiv नुसार, भारताने एप्रिलमध्ये रशियाकडून 10.01 लाख मेट्रिक टन तेल खरेदी केले. भारत सरकारने मे महिन्यात सांगितले होते की भारत अनेक देशांकडून पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आयात करत आहे. यामध्ये अमेरिकेचाही समावेश आहे. 

टॅग्स :रशियाभारतखनिज तेल