Join us

तेजीनं होणार भारताची प्रगती, '७ वर्षांत भारताची अर्थव्यवस्था दुपटीनं वाढून ७ लाख कोटींपार जाणार'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2024 8:54 AM

भारताच्या वेगवान अर्थव्यवस्थेबाबत सर्वच बाजूंनी चांगली बातमी येत आहे. तर दुसरीकडे चीनच्या अर्थव्यवस्थेला मात्र ब्रेक लागणार आहे.

India GDP Growth: भारताच्या वेगवान अर्थव्यवस्थेबाबत सर्वच बाजूंनी चांगली बातमी येत आहे. सातासमुद्रापार भारतासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. जागतिक रेटिंग एजन्सी मूडीजनं २०२४ साठी भारताचा जीडीपी वाढीचा दर ६.८ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मूडीजनं आपलं रेटिंग ६.१ टक्क्यांवरून ६.८ टक्के केलंय. आता आणखी एका रेटिंग एजन्सीनं भारताच्या विकासाच्या गतीला मान्यता दिली आहे. क्रिसिल रेटिंग एजन्सीनं भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत सकारात्मक संकेत दिलेत. CRISIL च्या अंदाजानुसार, आर्थिक वर्ष २०२५ मध्ये भारताचा जीडीपी ६.८ टक्क्यांच्या वेगाने वाढेल. रेटिंग एजन्सीस भारताचा विकासाचा दर वाढवत असताना आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या चीनची स्थिती मात्र बिकट आहे. आर्थिक मंदी आणि व्यवसायांसाठी प्रतिकूल परिस्थितींचा सामना करत असलेल्या चीननं यावर्षी पाच टक्के आर्थिक वृद्धीचं लक्ष्य ठेवलं आहे. 

रेटिंग एजन्सी क्रिसिलच्या मते, पुढील आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी ६.८ टक्के दरानं वाढण्याचा अंदाज आहे. रेटिंग एजन्सी क्रिसिलनं पुढील आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी वाढीचा दर ६.८ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे आणि २०३१ पर्यंत भारत उच्च-मध्यम उत्पन्न असलेला देश बनेल अशी शक्यता व्यक्त केलीये. २०३१ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था दुप्पट होऊन ७ ट्रिलियन डॉलर असंही त्यांनी म्हटलंय. 

भारतीय अर्थव्यवस्थेला देशांतर्गत संरचनात्मक सुधारणे आधार मिळेल. २०३१ पर्यंत  तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याची क्षमता राखू शकते आणि त्यात सुधारणाही करू शकते. चालू आर्थिक वर्षात अपेक्षेपेक्षा ७.६ टक्क्यांच्या वाढीनंतर, २०२४-२५ या आर्थिक वर्षात भारताची वास्तविक जीडीपी वाढ ६.८ टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा असल्यातं क्रिसिल रेटिंग्सनं आपल्या 'इंडिया आउटलुक' अहवालात म्हटलं आहे.  

७ लाख कोटींची अर्थव्यवस्था 

रिपोर्टनुसार, पुढील सात आर्थिक वर्षांमध्ये (२०२४-२५ ते २०३०-३१) भारतीय अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरचा टप्पा ओलांडून सात ट्रिलियन डॉलरच्या जवळपास पोहोचेल. क्रिसिलनं सांगितलं की, या कालावधीत अंदाजे सरासरी ६.७ टक्क्यांची वाढ भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवेल. आर्थिक वर्ष २०३०-३१ पर्यंत, त्याचे दरडोई उत्पन्न देखील उच्च-मध्यम उत्पन्न गटापर्यंत पोहोचेल. भारत सध्या ३.६ ट्रिलियन डॉलरच्या जीडीपीसह (GDP) जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. भारताच्या पुढे अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनी हे देश आहेत.

टॅग्स :भारतअर्थव्यवस्थाचीन