नवी दिल्ली : भारत लवकरच जगात दुसऱ्या क्रमांकाचा स्टील उत्पादक देश बनण्याच्या मार्गावर आहे. चीन व जपाननंतर भारत स्टील उत्पादनात सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. लवकरच जपानला मागे टाकून भारत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचेल, असा विश्वास केंद्रीय स्टील विभागाचे मंत्री बीरेंद्रसिंग यांनी व्यक्त केला आहे.
केंद्र सरकारने पायाभूत सोयींच्या विकासात सर्वाधिक गुंतवणूक करण्याचे लक्ष ठरवले आहे. रेल्वेसाठी १ लाख २५ हजार कोटी, राष्ट्रीय महामार्गांसाठी ८0 ते ८५ हजार कोटी आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेसाठी २0 हजार कोटींची तरतूद तर सरकारने चालू आर्थिक वर्षातच केली असल्याने भारतात स्टीलची मागणी हमखास वाढणार आहे.
‘सर्वांसाठी घरे’ योजनेत २0२२ पर्यंत शहरांमधे ३ कोटी तर ग्रामीण भागात २ कोटी अशी एकुण ५ कोटी घरे बांधली जाणार आहेत. या प्रकल्पांसाठीही स्टील लागणारच आहे. सिमेंट काँक्रिटऐवजी पूर्णत: लोखंडी पूल उभारल्यास तो १५ टक्के महाग असला तरी त्याचे आयुष्य किमान १५0 वर्षांचे असते. ही बाब लक्षात घेउन पुलांच्या उभारणीत स्टीलला उत्तेजन दिले जाणार आहे.
भारतातला स्टील उद्योग गेल्या तीन वर्षांपासून संकटात आहे, हे वास्तव मान्य करीत बीरेंद्रसिंग म्हणाले, भारतात व जगात १0 वर्षांपूर्वी स्टीलची मागणी अधिक होती. विकास दरही या काळात ८ ते ९ टक्के होता. २00२ ते २00५ कालखंडात भारतीय स्टील उद्योगाची उत्पादनक्षमता उत्तरोत्तर वाढत गेली. २0१३ पासून भारत, अमेरिका, युरोप व चीनमधेही स्टीलची मागणी घटली. चीनने या काळात भारतात स्वस्त दराचे स्टील डंप केले. साहजिकच भारतातल्या स्टील उद्योगाला या काळात मंदीचे चटके सोसावे लागले.
स्टील उत्पादनात जगात भारताचा दुसरा क्रमांक
भारत लवकरच जगात दुसऱ्या क्रमांकाचा स्टील उत्पादक देश बनण्याच्या मार्गावर आहे
By admin | Published: September 21, 2016 05:10 AM2016-09-21T05:10:21+5:302016-09-21T06:42:59+5:30