नवी दिल्ली: कोरोना संकटात देशाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात घसरल्याचे पाहायला मिळाले. कोरोनाच्या दोन लाटांचा तडाखा भारताला बसला. मात्र, आता सर्वच क्षेत्रे बहुतांश प्रमाणात पूर्वपदावर येताना दिसत आहेत. यातच केंद्रातील मोदी सरकारने आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी याविषयीची माहिती दिली आहे. केंद्र सरकारने निर्धारित केलेले निर्यातीचे (Export) लक्ष वेळेपूर्वीच पूर्ण केले आहे.
रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आयात-निर्यातीवर मोठा परिणाम पाहायला मिळत आहे. तरीही केंद्राने निर्यातीचे लक्ष्य पार करून महत्त्वाचा टप्पा वेळेपूर्वीच पूर्ण केले आहे. तब्बल ४०० अब्ज डॉलरच्या वस्तूंच्या निर्यातीचे लक्ष्य गाठण्यात भारताला यश आले आहे. पहिल्यांदा भारतात निर्यातीमधील हा विक्रमी आकडा गाठण्यात यश आले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. या यशाबद्दल मोदींनी देशातील वेगवेगळ्या क्षेत्रातील योगदान दिलेल्यांचे आभारही मानले आहेत.
आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी गाठलेला एक मैलाचा दगड
शेतकरी, उत्पादक, निर्यातदार, एमएसएमई क्षेत्रातील लोकांनी केलेल्या मेहनतीमुळे आणि कामगिरीमुळे हे लक्ष्य गाठता आले असल्याचा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला आहे. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टिकोनातून गाठलेला हा एक मैलाचा दगड आहे, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. केंद्र सरकारने ४०० अब्ज डॉलरच्या निर्यातीचे लक्ष्य निश्चित केले होते. हे लक्ष्य भारताने निर्धारीत वेळेच्या ९ दिवस आधीच पूर्ण केले आहे. पंतप्रधान मोदींनी दिलेल्या माहितीनुसार, भारत दररोज जवळपास एक अब्ज डॉलर्स किंमतीच्या वस्तूंची निर्यात करतो. जवळपास ४६ दशलक्ष डॉलर किंमतीचा माल दररोज वेगवेगळ्या देशात निर्यात केला जात असल्याचीही माहिती समोर आली आहे.
दरम्यान, एकीकडे निर्यातीचे टार्गेट पूर्ण झाले असले तरी रशिया-युक्रेन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या आणि इतर वस्तूंच्या किंमती या वाढलेल्या आहेत. वाढत्या व्यापार तुटीबद्दल जाणकारांनी चिंता व्यक्त केली आहे. दुसरीकडे, देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर पुन्हा एकदा घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे देशभरात गॅस सिलिंडरच्या किंमती एक हजार रुपयांवर पोहोचल्या आहेत.