नवी दिल्ली : २०२४ पर्यंत भारत पाच लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याबाबत मी अजूनही आशावादी आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. नियोजित वेळेपूर्वी आपली उद्दिष्टे पूर्ण करण्याचा आपल्या सरकारचा विक्रम असून, हे उद्दिष्टही प्राप्त केले जाईल, असे मोदी
म्हणाले.
मोदी यांनी एका मुलाखतीत सांगितले की, काही लोक निराशावादी आहेत. ते नकारात्मक बाेलत असतात; पण तुम्ही आशावादी लोकांसोबत बोललात, तर तुम्हाला नवनवीन कल्पना ऐकायला मिळतात. सुधारणा करण्यासाठी चांगल्या सूचना मिळतात. आज आपला देश आपल्या भवितव्याबाबत आशावादी आहे. पाच लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याबाबत देश आशावादी आहे. मोदी यांनी सांगितले की, संपूर्ण देशाने अभिमान बाळगून आणखी कठोर मेहनत करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कोरोना महामारीमुळे देशाचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. तथापि, मी पुन्हा प्रयत्न करीन
आणि चालू वर्षातील तोटा भरून काढण्यासाठी पुढील वर्षी अधिक वेगाने धावेन.
मोदी यांनी आपल्या आधीच्या उद्दिष्टांबद्दल सांगितले की, भारताने ग्रामीण स्वच्छता, गावांचे विद्युतीकरण आणि उज्ज्वला जोडण्या इत्यादी योजनांची निर्धारित उद्दिष्टे सरकारने नियोजित मुदतीच्या आत पूर्ण केली आहेत. त्यामुळे हे उद्दिष्टही सरकार पार करील, असा विश्वास लोकांना वाटतो.
मोदी म्हणाले की, खरेदी शक्तीच्या दृष्टीने भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था आहे. अमेरिकी डॉलरच्या चालू किमतीच्या दृष्टीनेही भारताला तिसरे स्थान मिळावे, अशी आमची इच्छा आहे. भारत ५ लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था बनल्यास हे स्थान मिळवून देण्यात आपल्याला मदत होईल.