नवी दिल्ली : भारत २०२७-२८ पर्यंत जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनेल, असे प्रतिपादन प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ तथा नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष अरविंद पनगढिया यांनी केले आहे.
सध्या कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या पानगारिया यांनी एका मुलाखतीत सांगितले की, सध्या भारत हा जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था आहे. यंदाच्या आर्थिक सर्वेक्षणातील माहितीतून असे दिसते की, भारतीय अर्थव्यवस्था खूपच मजबूत आहे. आज अर्थव्यवस्था ६.५ टक्के दराने वाढत आहे. मात्र, अर्थव्यवस्थेची क्षमता त्यापेक्षा अधिक असल्याचे चित्र समोर येत आहे. अर्थव्यवस्थेचा वृद्धिदर ७ टक्क्यांपर्यंत वाढू शकतो.
भारत आज अशा जागेवर उभा आहे, जेथे तो २००३ मध्ये होता. तेव्हा भारत ८ टक्के वृद्धिदराच्या निकट आला होता. नंतर अनेक वर्षांपर्यंत हा वृद्धिदर पुढे कायम राहिला, असे पानगारिया म्हणाले.