नवी दिल्ली : भारतात चिनी स्मार्टफोन कंपन्यांची मोठी बाजारपेठ आहे. Xiaomi, Oppo, Coolpad, OnePlus सारख्या स्मार्टफोन कंपन्या भारतात त्यांचा व्यवसाय करतात. पण, आता भारत सरकारने या कंपन्यांवर आपली पकड घट्ट केली आहे. चिनी मोबाईल कंपन्यांना भारतात व्यवसाय करायचा असेल, तर त्यांना त्यांच्या स्थानिक कामकाजासाठी भारतीय भागीदार निवडावे लागतील, असे भारत सरकारने स्पष्ट केले आहे.
चिनी स्मार्टफोन कंपन्यांसाठी कठोर भूमिका घेत सरकारने म्हटले की, जर त्यांना त्यांचा कोणताही माल किंवा फोन भारतात विकायचा असेल, तर त्यांनी आधी त्यांचा भारतीय भागीदार निवडला पाहिजे. भारतीय भागीदार जोडल्याशिवाय ते भारतात उत्पादन करू शकणार नाहीत. चिनी कंपन्यांना आपला मोबाईल फोन किंवा इतर उत्पादने भारतात बनवायची आणि विकायची असेल, तर सरकारच्या अटींचे पालन करावेच लागेल.
सरकारने स्पष्टपणे म्हटले की, जर चिनी कंपन्यांना भारतात व्यवसाय करायचा असेल, तर त्यांचे स्थानिक भागीदार तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), मुख्य कार्यकारी अधिकारी (COO), मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) आणि मुख्य तांत्रिक अधिकारी (CTO) भारतीय असावेत. अशा पदांवर भारतीय अधिकाऱ्यांचीच नियुक्ती करावी लागेल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. म्हणजेच आता चिनी कंपन्यांना भारतात व्यवसाय करण्यासाठी भारतीय बॉसची गरज भासणार आहे.