Nirmala Sitharaman : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात अनेक क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. दरम्यान, यानंतर 'भारत 7 टक्के विकासदराने पुढे जाईल. महागाई नियंत्रणात ठेवत आम्ही जलद वाढ साधू', असे वक्तव्य सीतारामन यांनी केले आहे.
हिंदी वृत्तवाहिनी नेटवर्क18 ला दिलेल्या मुलाखतीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, देश 7 टक्के विकासदराने पुढे जात आहे. मुख्य आर्थिक सल्लागारांनी या विषयावर आधीच त्यांची मते तपशीलवार मांडली आहेत. मला आशा आहे की, हे लक्ष्य साध्य करण्यात आम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. भारताचीअर्थव्यवस्था सतत वाढत आहे. महागाई नियंत्रणात ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.'
सीतारामन पुढे म्हणाल्या, 'आम्हाला पूर्ण आशा आहे की आम्ही संतुलित महागाई दराने आर्थिक विकासाचे उद्दिष्ट साध्य करू. पीएम मोदी आर्थिक सुधारणांच्या बाजूने आहेत आणि सरकार या दिशेने सातत्याने वाटचाल करत आहे. मला वाटते की परदेशी रेटिंग एजन्सींनी भारतात होत असलेल्या आर्थिक सुधारणांकडे लक्ष द्यावे आणि त्यानुसार त्यांचे मते द्यावीत.'
'अर्थसंकल्पाबाबत बरीच चर्चा सुरू आहे. सामान्य माणसाला मनापासून मदत करणे हे पंतप्रधानांचे ध्येय आहे. या सरकारला सर्वसामान्यांची काळजी आहे आणि लोकांना हे समजले आहे. तळागाळातील लोक सरकारच्या योजनांबद्दल बोलत आहेत. ज्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळाला आहे, त्यांना सरकारचा हेतू समजतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीला सरकारकडून फायदा होतो तेव्हा त्याचा आत्मविश्वास वाढतो,' असंही त्या यावेळी म्हणाल्या.