Join us  

डाळींचे भाव कमी करण्यासाठी सरकारचा 'मास्टरप्लॅन'; महागाईवर प्रभावी ठरणार 'हा' उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2023 12:49 PM

येत्या दोन महिन्यात केंद्र सरकार उचलणार महत्त्वाचे पाऊल

Pulses price hike, Tur Urad Dal : वाढती महागाई हा आजच्या युगातील सर्वाधिक चर्चेचा विषय आहे. विशेषत: डाळींच्या दरातील महागाईत सातत्याने होणारी वाढ चिंतादायक आहे. ती कमी करण्यासाठी सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. देशांतर्गत बाजारात तूर आणि उडीद डाळीच्या किमती कमी करण्यासाठी सरकारने डाळींची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार जानेवारीमध्ये 400,000 टन तूर डाळ आणि फेब्रुवारीमध्ये म्यानमारमधून 1 दशलक्ष टन उडीद डाळ आयात करणार आहे. कापणी सुरू असताना भारत तूर आयातीची घोषणा करत आहे. कारण उत्पादन क्षेत्र घटल्यामुळे सरकारला गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी उत्पादनाची अपेक्षा आहे.

डाळी किती महागल्या?

या वर्षी जानेवारी महिन्यात सरकारने तूर आणि उडीद साठेबाजी रोखण्यासाठी आणि ग्राहकांना दिलासा देण्यासाठी साठेबाजीवर मर्यादा घातली होती. ही साठेबाजी मर्यादा ३० ऑक्टोबरला संपणार होती, पण सरकारने ती डिसेंबर अखेरपर्यंत वाढवली. सरकारी आकडेवारीनुसार, मंगळवारी उडदाची अखिल भारतीय किरकोळ किंमत गतवर्षीच्या 9,627.48 रुपयांच्या तुलनेत 11,198.09 रुपये प्रति क्विंटल होती. तूर (40.94 टक्के), हरभरा (11.16 टक्के) आणि मूग (12.75 टक्के) यांच्या किमतीत झपाट्याने वाढ झाल्यामुळे ऑक्टोबरमध्ये डाळींची किरकोळ महागाई 18.79 टक्के झाली. सप्टेंबरमध्ये तूर महागाईचा दर ३७.३ टक्क्यांहून अधिक होता. मार्च महिन्यात सरकारने तूर आयात शुल्क रद्द करून आफ्रिका आणि म्यानमारमधून आयात वाढवण्याचे प्रयत्न केले होते, तेव्हाची ही स्थिती आहे.

गेल्या काही महिन्यांची परिस्थिती

  • कन्झ्युमर अफेअर्सच्या वेबसाइटनुसार, 5 डिसेंबर रोजी तूर डाळीची सरासरी किंमत 155 रुपये प्रति किलो होती. तर हीच किंमत 1 नोव्हेंबरला 152.92 रुपये प्रति किलो, 1 ऑक्टोबरला 151.54 रुपये आणि 1 सप्टेंबरला 141.57 रुपये प्रति किलो होती.
  • कंझ्युमर अफेअर्सच्या वेबसाइटनुसार, 5 डिसेंबर रोजी उडीद डाळीची सरासरी किंमत 123.11 रुपये प्रति किलो होती. तर हाच भाव 1 नोव्हेंबरला 120.32 रुपये प्रति किलो, 1 ऑक्टोबरला 117.85 रुपये आणि 1 सप्टेंबरला 115.73 रुपये प्रति किलो होता.
  • कंझ्युमर अफेअर्सच्या वेबसाइटनुसार, 5 डिसेंबर रोजी मूग डाळीची सरासरी किंमत 116.91 रुपये प्रति किलो होती. तर हीच किंमत 1 नोव्हेंबरला 115.99 रुपये प्रति किलो, 1 ऑक्टोबरला 114.61 रुपये आणि 1 सप्टेंबरला 111.88 रुपये प्रति किलो होती.
  • कंझ्युमर अफेअर्सच्या वेबसाइटनुसार, 5 डिसेंबर रोजी मसूरची सरासरी किंमत 94.49 रुपये प्रति किलो होती. तर हाच भाव १ नोव्हेंबरला ९४.०४ रुपये प्रति किलो, १ ऑक्टोबरला ९३.५२ रुपये आणि १ सप्टेंबरला ९२.६६ रुपये प्रति किलो होता.
टॅग्स :महागाईकेंद्र सरकारम्यानमार