वॉशिंग्टन : जागतिक बँकेने चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी भारताचा आर्थिक विकास दर ६.३ टक्के इतका कमी केला आहे. जागतिक बँकेने जानेवारीत केलेल्या आधीच्या अंदाजापेक्षा हा ०.३ टक्के कमी आहे.
जागतिक बँकेने मंगळवारी सांगितले की, भारतात खासगी उपभोग आणि गुंतवणुकीत अभूतपूर्व वाढ होत आहे. त्याच वेळी सेवा क्षेत्राची वाढदेखील मजबूत आहे. जागतिक बँकेने आपल्या ताज्या अहवालात हा अंदाज व्यक्त केला आहे. त्यात म्हटले आहे की, जागतिक विकास दर २०२२ मध्ये ३.१ टक्क्यांवरून २०२३ मध्ये २.१ टक्क्यांपर्यंत घसरेल. चीन व्यतिरिक्त उदयोन्मुख बाजारपेठा आणि विकसनशील अर्थव्यवस्थांमधील वाढ मागील वर्षीच्या ४.१ टक्क्यांवरून यावर्षी २.९ टक्क्यांपर्यंत खाली येण्याचा अंदाज आहे. यामुळे विकासदरात मोठी घसरण दिसून येते. (वृत्तसंस्था)
विकासदराचा अंदाज म्हणजे नशीब नसते : बंगा
जागतिक बँक समूहाचे नवनियुक्त अध्यक्ष अजय बंगा म्हणाले, “गरिबी कमी करण्याचा आणि समृद्धी पसरवण्याचा सर्वांत खात्रीचा मार्ग रोजगार आहे. मंद वाढ म्हणजे रोजगार निर्मितीही कठीण होईल. विकासदराचा अंदाज म्हणजे नशीब नसते हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. तो बदलण्याची संधी आपल्याकडे आहे, परंतु त्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे. भारतीय वंशाच्या बंगा यांनी शुक्रवारीच जागतिक बँकेचे अध्यक्षपद स्वीकारले.
भारत सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहणार
जागतिक बँकेच्या अहवालात म्हटले आहे की, भारतातील मंद विकास दराचे कारण उच्च महागाई आणि कर्जाच्या वाढत्या खर्चामुळे खासगी उपभोगावर होणारा परिणाम आहे. अहवालानुसार, “आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये चलनवाढ समाधानकारक श्रेणीच्या मध्यात आल्यानंतर सुधारणांमुळे वाढीचा वेग वाढेल. उदयोन्मुख प्रमुख विकसनशील अर्थव्यवस्थांपैकी भारत एकंदरीत आणि दरडोई जीडीपी दोन्हीमध्ये जगातील सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहील.