दाओस : जगभरात मंदीची चिंता भेडसावत असतानाच भारतासाठी आशादायी चित्र निर्माण झाले आहे. जगभरात उद्योगवाढीसाठी ज्या पाच देशांचा उल्लेख येथील एका सर्वेक्षणातून पुढे आला, त्यामध्ये भारताचा समावेश आहे. इतर देशांमध्ये अमेरिका, चीन, जर्मनी, ब्रिटनचा समावेश आहे. जागतिक आर्थिक विकास मंच बैठकीसाठी येथे जमलेले विविध कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थात सीईओ यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत विकासाबाबत मात्र फार आशावादी नाहीत. असे असले तरी भारताबाबत मात्र आशादायक स्थिती असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. ‘पीडब्ल्यूसी’ ने घेतलेल्या सर्वेक्षणात ही बाब स्पष्ट झाली. एकूणच जागतिक स्थितीबाबत गेल्या वर्षी ३७ टक्के सकारात्मक असलेल्या सीईओंची संख्या यंदा घटून २७ टक्के झाली आहे. ‘पीडब्ल्यूसी’चे अध्यक्ष दीपक कपूर म्हणाले की, भारतीय सीईओंनी देशात विकासदर चांगला असेल असे संकेत दिले आहेत. कंपन्याच्या उत्पन्नाबाबत ते त्यांच्या विदेशी भागीदारांपेक्षा अधिक आत्मविश्वासपूर्ण वाटले. भूराजकीय जोखीम, तेलाचे पडते भाव, चीनचा घटत चाललेला विकास दर यामुळे व्यापार जगत चिंतेत असतानाच आशियाई शेअर बाजार कोसळत असल्याचे वृत्त बुधवारी आले. या पार्श्वभूमीवर ‘पीडब्ल्यूसी’ ने आर्थिक मंच बैठकीसाठी आलेल्या ८३ देशातील १४०९ सीईओंच्या मुलाखती घेतल्या. ‘पीडब्ल्यूसी’चे जागतिक विभागाचे प्रमुख डेनिस नॅली म्हणाले की, जागतिक पातळीवर तसेच आपापल्या देशातील अर्थव्यवस्थेला झटके बसत आहेत याची जाणीव प्रत्येक सीईओला आहे. उद्योग छोटा असो वा मोठा, स्थिती गुंतागुंतीची तर आहेच, शिवाय भूराजकीय स्थिती, नियंत्रणे, सायबर सुरक्षा, सामाजिक घडामोडी, लोक तसेच विश्वासार्हता यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. हे प्रत्येक सीईओ मान्य करीत आहे.
उद्योगवाढीसाठी भारत जगात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2016 3:12 AM