जगभरात सध्या 'सुपर-ॲप' इकोसिस्टम विकसित करण्यासंदर्बात जबरदस्त स्पर्धा सुरू आहे. भारताचे 'Umang' आणि चीनचे 'WeChat' ही 'सुपर-ॲप'ची सुंदर उदाहरणे आहेत. याच प्रमाणे आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क हे संपूर्ण जगासाठी, 'X' प्लॅटफॉर्मला 'एव्हरीथिंग ॲप' (Everything App) बनवण्याच्या तयारीत आहेत.
इलॉन मस्क यांनी २०२२ मध्ये ट्विटरचे अधिग्रहण केले. तेव्हापासूनच ते या प्लॅटफॉर्मवर वेगाने काम करत आहेत. मेसेजिंग, सोशल मीडिया, शॉपिंग, पेमेंट आणि व्हिडिओ कॉलिंग आदी सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. यासाठी 'X Money' ची मोठी तयारी सुरू असून, पुढील महिन्यापासून याचे बीटा व्हर्जन लॉन्च केले जाणार आहे. याद्वारे युजर्सना मनी ट्रान्सफरची सुविधा मिळेल.
सुपर ॲप म्हणजे नेमके काय? -
सुपर ॲप हे एक असे प्लॅटफॉर्म आहे, जेथे युजर्सना एकाच ॲपवर अनेक सुविधा मिळतात. याचे एक चांगले उदाहरण म्हणजे, भारतीय रेल्वेने अलीकडेच लॉन्च केलेले 'रेल वन' ॲप. यात तिकीट बुकिंगपासून ते लाइव्ह स्टेटसपर्यंत सर्व प्रकारची माहिती मिळते.
असे असतील नवीन फीचर्स -
आगामी काळात 'X' वर डिजिटल पेमेंट आणि वॉलेटची सुविधाही उपलब्ध होईल. यासाठी 'व्हिसा' (VISA) सारख्या कंपन्यांशी भागीदारी करण्यात आली आहे. याशिवाय, स्टॉक ट्रेडिंग आणि गुंतवणुकीच्या सेवा तसेच शॉपिंग सुविधेचाही यात समावेश असेल.
असा आहे मस्क यांचा प्लॅन -
इलॉन मस्क यांना केवळ एका देशापुरते मर्यादित न राहता 'ग्लोबल सुपर ॲप' तयार करायचे आहे. मात्र, यासाठी विविध देशांचे वित्त नियम, डेटा प्रायव्हसी कायदे आणि वेगवेगळ्या एजन्सींच्या परवानग्या मिळवणे हे मोठे आव्हान असणार आहे. युजर्सने प्लॅटफॉर्मवर जास्तीत जास्त वेळ घालवावा आणि नवीन महसूल मॉडेल उभे करणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
