Join us

"भारत सेमीकंडक्टर राष्ट्र बनणार; टाटा कंपनी युद्धपातळीवर काम करणार"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 3:33 PM

टाटा सन्सचे चेअरमन चंद्रशेखर यांनी आनंद व्यक्त केला आहे. 

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते आज देशातील १.२५ लाख कोटी रुपयांच्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. आसाम आणि गुजरातमध्ये हे प्रकल्प होत असून टाटा कंपनीने यासाठी पुढाका घेतला आहे. टाटा सन्स आणि पीएसएमसीने ९१ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून मेगा सेमी कंडक्टर फॅब्रिकेशन फॅसिलिटी बनवण्याचा निर्णय घेतला आहे. टाटा ग्रुप पीएमसीसोबत एकत्र येत, फॅब्रिकेशन फॅसिलिटीचा प्रकल्प उभारत आहे. या फॅसिलिटीमधून दर महिन्याला ५०,००० वेफर्स तयार केले जाणार आहेत. त्यामुळे, भारतातील पहिली सेमी कंडक्टर चीप २०२६ मध्ये पुढे येईल. त्यामुळे, आजचा दिवस अतिशय आनंदाचा व महत्त्वाचा असल्याचं टाटा सन्सचे चेअरमन चंद्रशेखर नटराजन यांनी म्हटले. 

भारतात स्वदेशी सेमीकंडक्टर इकोसिस्टम तयार करण्याच्या दिशेनं एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, भारत सरकारनं टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या गुजरातमधील मेगा सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन सुविधा (फॅब) तयार करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. यावर्षी एकूण ९१,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह फॅबची उभारणी सुरू होईल आणि याद्वारे २० हजारांहून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण होतील. या घोषणेसह, टाटा इलेक्ट्रॉनिक्सनं जागतिक सेमीकंडक्टर उद्योगात प्रवेश केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज या सेमीकंडक्टर प्रकल्पाची पायाभरणी केली. यापैकी एक प्रकल्प आसामच्या मोरिगाव तर दुसरा प्रकल्प गुजरातच्या धोलेरा आणि सानंद येथे उभारण्यात येत आहे. त्यामुळे, टाटा सन्सचे चेअरमन चंद्रशेखर यांनी आनंद व्यक्त केला आहे. 

"निश्चितच हा एक महत्त्वाचा क्षण आहे. आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. कोणत्याही डिजिटल यंत्रणांसाठी सेमीकंडक्टर मूलभूतपणे आवश्यक आहे. त्यामुळे, भारतासाठी सेमीकंडक्टर राष्ट्र बनणे खूप महत्त्वाचे आहे. मला खूप आनंद आहे की टाटा समूहाने आसाममधील पहिले स्वदेशी असेंब्ली युनिट म्हणून देशातील पहिले सेमीकंडक्टर फॅब स्थापन करण्यात यश मिळवले आहे'', असे टाटा सन्सचे चेअरमन नटराजन चंद्रशेखरन यांनी म्हटलं आहे. 

सेमी कंडक्टर प्रकल्पामुळे आसाममध्ये भरपूर समृद्धी येऊन येथे मोठ्या प्रमाणात नोकऱ्या पाहायला मिळतील. येथील विशिष्ट गुंतवणुकीमुळे त्या भागाचा चेहरामोहरा बदलेल. आम्ही टाइमलाइनला गती देत असून सर्वसामान्यपणे सेमी कंडक्टरच्या एका फॅबला 4 वर्षे लागतात. मात्र, आम्ही २०२६ मध्ये सेमी कंडक्टरची पहिली चिप तयार करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. त्या वर्षाच्या उत्तरार्धात ते पूर्ण होईल, असे नटराजन यांनी म्हटले. तर, आसाममध्ये २०२५ च्या उत्तरार्धात आणि २०१६ च्या सुरुवातीसही आम्ही आसाममध्ये व्यावसायिक उत्पादन करू शकतो.", असेही नटराजन यांनी सांगितले. 

पहिला AI-अनेबल्ड पॉवरचिप सेमीकंडटर प्लांट 

टाटा इलेक्ट्रॉनिक्स, पॉवरचिप सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशनसह (PSMC) भागीदारीत भारतातील पहिला AI-अनेबल्ड अत्याधुनिक फॅब उभारेल. फॅबची उत्पादन क्षमता दरमहा ५०,००० इतकी असेल आणि त्यात नेक्स्ट जनरेशन फॅक्टरी ऑटोमेशन क्षमतांचा समावेश असेल ज्यामध्ये डेटा ॲनालिटिक्स आणि इंडस्ट्रीची सर्वोत्तम फॅक्टरी कार्यक्षमता साध्य करण्यासाठी मशीन लर्निंगचाही समावेश असेल. नवीन सेमीकंडक्टर फॅब ऑटोमोटिव्ह, कम्प्युटिंग आणि डेटा स्टोरेज, वायरलेस कम्युनिकेशन आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स सारख्या मागणीकडे पाहता आयसीज, मायक्रोकंट्रोलर आणि कम्प्युटिंग लॉजिक्ससाठी चिप्स तयार करेल.

गुजरात समिटमध्ये झाला निर्णय

टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी जानेवारी २०२४ मध्ये २० व्या व्हायब्रंट गुजरात समिटमध्ये धोलेरा येथे सेमीकंडक्टर फॅब उभारण्याचा टाटा समूहाचा निर्णय जाहीर केला होता. २०३० पर्यंत जागतिक सेमीकंडक्टर उद्योग १ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. तर भारतातील सेमीकंडक्टरची मागणी ११० अब्ज डॉलर्सची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. येत्या काळात सेमीकंडक्टर उद्योगात भारत एक अतिशय महत्त्वाचा प्लेयर बनेल.

टॅग्स :टाटानरेंद्र मोदीगुजरातआसामनोकरी