नवी दिल्ली : भारताला सॉफ्टवेअर हब बनविणार असल्याचा इरादा केंद्र सरकारने जाहीर केला आहे. १00 अब्ज डॉलरपेक्षा अधिकच्या देशांतर्गत आयटी सेवा उद्योगाने ‘मेड इन इंडिया’ उत्पादनांवर काम करावे, यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे.
संचार आणि आयटी मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, भारताला सॉफ्टवेअर हब बनविण्यासाठी सरकार दीर्घकालीन योजना आखत आहे. उद्योग संघटना नास्कॉम आणि इतर महत्त्वपूर्ण संघटनांशी यासंदर्भात चर्चा केली जात आहे. भारताला सॉफ्टवेअर उत्पादनांचे राष्ट्र बनविण्यासाठी काय करता येईल, या मुद्यावर या क्षेत्रातील मान्यवरांशी सरकार बातचीत करण्यात येत आहे.
भारतातील आयटी उत्पादने आणि व्यवसाय प्रक्रिया व्यवस्थापनातून (आयटी-बीपीएम) २0१२-१३ या आर्थिक वर्षात १0९ अब्ज डॉलरचा महसूल निर्माण झाला. त्यातील आयटी क्षेत्राचा महसूल २.२ अब्ज डॉलर आहे. त्यातील ३0 टक्के महसूल देशांतर्गत बाजारातील आहे.
आयटी उद्योगांची संघटना नास्कॉमने २0२0 पर्यंत सॉफ्टवेअर उत्पादनांतून मिळणाऱ्या महसुलात ५ टक्के वाढ करून तो १0 अब्ज डॉलरवर नेण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, स्टार्ट अप कंपन्यांशी या संदर्भात प्रामुख्याने चर्चा करण्यात येईल. या कंपन्या सॉफ्टवेअर उत्पादनांच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. याशिवाय देशांतर्गत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात आयटीचा वापर वाढविण्यावरही विचार केला जाईल. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यावर भर राहील. (लोकमत न्यूज नेटवर्क)
भारताला सॉफ्टवेअर हब बनविणार
भारताला सॉफ्टवेअर हब बनविणार असल्याचा इरादा केंद्र सरकारने जाहीर केला आहे
By admin | Published: July 3, 2014 05:18 AM2014-07-03T05:18:09+5:302014-07-03T05:18:09+5:30