Join us

भारत इराणी तेलाची आयात कमी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2017 12:51 AM

इराणमधून करण्यात येणाऱ्या तेलाची आयात सुमारे २५ टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे.

नवी दिल्ली : इराणमधून करण्यात येणाऱ्या तेलाची आयात सुमारे २५ टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. २0१७-१८ या वर्षातच या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.भारत हा इराणचा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा तेल ग्राहक आहे. चीन प्रथम क्रमांकावर आहे. इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमानंतर पाश्चात्य देशांनी इराणवर निर्बंध लादले होते. या निर्बंधांतही इराणकडून तेल खरेदी करणाऱ्या मोजक्या देशांत भारताचा समावेश होता. गेल्या वर्षी काही निर्बंध उठविण्यात आल्यानंतर इराणने तेल व्यवहारांत आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे भारताने तेल आयातीत कपात करण्याचा निर्णय घेतला. कंपन्यांना तसे आदेश देण्यात आले आहेत.एका भारतीय अधिकाऱ्याने सांगितले की, फर्जाद बी गॅस क्षेत्राच्या हक्कांवरून दोन्ही देशांत मतभेद झाले आहेत. आमच्या कंपन्यांना हक्क देण्याच्या बाबतीत कोणतीही प्रगती होताना दिसत नाही. त्यामुळे आम्ही तेल आयात कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या मुद्यावर तोडगा न निघाल्यास आयात आणखी कमी करण्यात येईल. भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्यांनी नॅशनल इराणीयन आॅईल कंपनीच्या (एनआयओसी) प्रतिनिधींना सांगितले की, तेल आयातीत एक पंचमांश कपात करण्यात येणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)