Join us  

अप्रेझलचा महिना आला! भारतीयांची होणार चांदी; सिंगापूर, चीन, हाँगकाँगच्या तुलनेत सर्वाधिक पगारवाढ 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2023 3:02 PM

मार्च हा भारतातील आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना आहे. त्यामुळे बहुतांश कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांचे मूल्यांकन (अप्रेझल) याच महिन्यात सुरू होते.

मार्च हा भारतातील आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना आहे. त्यामुळे बहुतांश कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांचे मूल्यांकन (अप्रेझल) याच महिन्यात सुरू होते. विविध कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये पगारवाढीच्या गप्पाही रंगल्या असतील. यातच भारतीयांसाठी एक चांगली बातमी एका सर्व्हेक्षणातून समोर आली आहे. २०२३ मध्ये आशिया-पॅसिफिक प्रदेशातील अनेक देशांमध्ये पगारवाढीच्या अपेक्षेबाबत एक सर्वेक्षण करण्यात आले आहे, त्यानुसार भारतात सरासरी सर्वाधिक पगारवाढ होणार आहे.

जागतिक स्तरावर सल्लामसलत, ब्रोकिंग इत्यादीसाठी उपाय पुरवणाऱ्या WTW ने आपल्या सॅलरी बजेट प्लॅनिंग सर्व्हेमध्ये चीन, व्हिएतनाम, इंडोनेशिया, हाँगकाँग आणि सिंगापूर यांसारख्या देशांमध्ये सरासरी पगारात वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे.

भारतात सर्वाधिक पगारवाढसर्वेक्षणातील दाव्यानुसार २०२३ मध्ये भारतातील लोकांच्या सरासरी पगारात १० टक्के वाढ अपेक्षित आहे. २०२२ मध्ये ही सरासरी ९.८ टक्के इतकी होती. पगारातील ही वाढ संपूर्ण आशिया-पॅसिफिक प्रदेशात सर्वाधिक आहे. २०१९ मध्ये सरासरी पगारवाढ ९.९ टक्के इतकी होती. कोरोनामुळे २०२० मध्ये ती ७.५ टक्क्यांवर आली होती. पुढे २०२१ मध्ये लोकांची सरासरी पगारवाढ ८.५ टक्के इतकी राहिली आणि २०२२ मध्ये ती पूर्वपदावर आली.

चीन, सिंगापूर, हाँगकाँगची परिस्थिती काय?आशिया-पॅसिफिकच्या इतर देशांवर नजर टाकल्यास भारतानंतर व्हिएतनाममध्ये सर्वाधिक पगारवाढ दिसून येईल. २०२३ मध्ये व्हिएतनाममधील लोकांच्या सरासरी पगारात ८ टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे. दुसरीकडे, पगारवाढ इंडोनेशियामध्ये ७ टक्के, चीनमध्ये ६ टक्के, हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये ४ टक्के असू शकते.

कोणत्या क्षेत्राची चलती?WTW इंडियाचे कन्सल्टिंग लीडर, वर्क अँड रिवॉर्ड्स, राजुल माथूर म्हणतात की, कर्मचाऱ्यांना कायम ठेवल्यामुळे आणि व्यवसायाच्या संधी वाढल्यामुळे या वर्षी कंपन्या पगारवाढीवर भर देतील. सर्वेक्षणातील माहितीनुसार या वर्षी वित्तीय सेवा, टेक मीडिया आणि गेमिंग, फार्मास्युटिकल्स आणि बायोटेक्नॉलॉजी, रसायने आणि रिटेल क्षेत्र अशा नोकऱ्या आहेत जिथे चांगली पगारवाढ अपेक्षित आहे.

टॅग्स :व्यवसाय