मुंबई : सामान्य मर्यादेपेक्षा काही पट अधिक प्रदूषण करत सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या फोक्सवॅगन कंपनीने आता भारतातून एक लाख गाड्या माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला असल्याचे वृत्त आहे. भारतात ज्या गाड्या माघारी बोलावण्यात येतील त्यामध्ये कंपनीच्या लोकप्रिय अशा व्हेन्टो, जेट्टा, पसाट या तीन मॉडेलचा समावेश असेल असे समजते.या गाड्या ८ नोव्हेंबरपर्यंत कंपनी परत घेण्याच्या तयारीत आहे. तसेच, ज्या गाड्या माघारी बोलवण्यात येणार असल्याची माहिती आहे, त्या गाड्या या भारतात निर्मिती झालेल्या नसून आयात करण्यात आलेल्या आहेत. भारतात निर्मिती झालेल्या सुमारे २० हजार डिझेल इंजिनच्या गाड्या माघारी बोलावण्याची शक्यता असल्याचे समजते. ज्या वाहनांमध्ये हा गैरप्रकार केला आहे, ते इंजिन ‘ईए-१८९’ या बनावटीचे असून केवळ अमेरिकाच नव्हे तर भारतासह अनेक देशांतून या इंजिनचा समावेश असलेल्या कंपनीच्या गाड्या आहेत. प्राथमिक अंदाजानुसार कंपनीच्या अशा वाहनांची संख्या ही एक कोटी १० लाख इतकी आहे.या सर्व गाड्या डिझेल इंजिनच्या आहेत. फोक्सवॅगन कंपनीने केलेल्या घोटाळ््याची माहिती उघड झाल्यानंतर अमेरिकी पर्यावरण एजन्सीने कंपनीवर कारवाईचा बडगा उगारला. यानंतर कंपनीने तातडीने अमेरिकेतील पाच लाख वाहने माघारी बोलावली.त्यापाठोपाठ युरोपातील काही देशांतूनही कंपनीच्या गाड्या माघारी बोलावण्यास सुरुवात झाली. त्यानंतर आता भारतातूनही एक लाख गाड्या माघारी बोलावणार असल्याचे समजते. भारतात १ लाख ३० हजार वाहनांची निर्मिती फोक्सवॅगन कंपनीचा महाराष्ट्रातही प्रकल्प असून तो पुण्यात आहे. या प्रकल्पातून वर्षाकाठी एक लाख ३० हजार वाहनांची निर्मिती कंपनी करते, असे या क्षेत्रातील सूत्रांनी सांगितले.१५ वर्षांत प्रथमच तोटाजागतिक वाहन बाजारात ७८ वर्षांपासून कार्यरत असलेल्या फोक्सवॅगन कंपनीने गेल्या १५ वर्षांत प्रथमच तोटा नोंदविल्याचे वृत्त आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीने तीन अब्ज ४८ कोटी अमेरिकी डॉलरचा तोटा झाल्याचे वृत्त वृत्तसंस्थेने दिले आहे. वाहनातून होणाऱ्या कार्बन व नायट्रोजन आॅक्साईड अशा घातक वायूंच्या उत्सर्जनाची खरी माहिती दडवून सॉफ्टवेअरच्या आधारे ती बनावट पद्धतीने सादर करणाऱ्या फोक्सवॅगन कंपनीच्या भारतातील वाहनांची सखोल तपासणी करत या संदर्भातील अहवाल देण्याचे आदेश केंद्र सरकारने ‘आॅटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन आॅफ इंडिया’ (एआरएआय) या संस्थेला दिले आहेत. कंपनीचा अहवाल आगामी आठवड्यात येणे अपेक्षित आहे. या अहवालानंतरच कंपनीवरील कारवाईची दिशा स्पष्ट होणार आहे. अमेरिका आणि युरोपातील देशांच्या तुलनेत भारतात वाहनातून होणाऱ्या उत्सर्जनाचे निकष वेगळे आहेत. येथील निकषांच्या आधारे कंपनीने भारतात किती प्रदूषण केले आहे, याचीही सखोल तपासणी होणार आहे.
भारतातून १ लाख गाड्या माघारी घेणार?
By admin | Published: October 29, 2015 9:36 PM