लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : रस्ते व महामार्ग बांधणी क्षेत्रात कार्यरत एल्सामेक्स या स्पेनच्या कंपनीसोबत भागीदार असलेल्या आयएल अँड एफएस ट्रान्सपोर्टेशन कंपनीने एक्स्पोर्ट-इम्पोर्ट बँक ऑफ इंडियाला (एक्झिम बँक) तब्बल २३९ कोटी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी सीबीआयने कंपन्या व त्यांचे संचालक अशा एकूण सात जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. समूहाविरोधात यापूर्वीही घोटाळ्यासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, भारतातील काही प्रमुख महामार्गांची बांधणी, देखभाल आदींसाठी स्पेनच्या या कंपनीने मुंबईस्थित आयएल अँड एफएस ट्रान्सपोर्टेशन या कंपनीसोबत संयुक्त करार केला होता. तसेच, या कामांसाठी २०१६ मध्ये कंपनीने एक्झिम बँकेकडून २६२ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, कर्जाची रक्कम आणि कंपनीला मिळालेले काम यांचे प्रमाण जुळत नसल्याचे आढळून आल्यानंतर बँकेने या कर्ज प्रकरणाची चौकशी सुरू केली होती.