नवी दिल्ली: कोरोना संकट काळात देशाची अर्थव्यवस्था कठीण काळातून जात असताना दुसरीकडे मात्र, बँकांची फसवणूक करण्याचे प्रकार थांबताना दिसत नाही. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेने अनेक खासगी तसेच सावर्जनिक क्षेत्रातील बँकांना कोट्यवधीचे दंड ठोठवल्याचे उदाहरण ताजे असतानच एका सरकारी बँकेत घोटाळा झाल्याची माहिती मिळाली आहे. तीन कंपन्यांनी मिळून या बँकेला तब्बल २६६ कोटी रुपयांना चुना लावल्याचे सांगितले जात आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन बँकेत कोट्यवधींची फसवणूक झाली आहे. इंडियन बँकेने म्हटले आहे की, भारतीय रिझर्व्ह बँकला तीन नॉन-परफॉर्मिंग अॅसेट खात्यांबाबत २६६ कोटी रुपयांपेक्षा जास्त फसवणूक केल्याचा अहवाल दिला आहे. ही नॉन-परफॉर्मिंग खाती फसवी खाती म्हणून घोषित करण्यात आली आहेत आणि नियामक आवश्यकतेनुसार याबाबतची माहिती रिझर्व्ह बँकेला देण्यात आली आहे.
तिन्ही प्रकरणांमध्ये थकबाकीला फंड डायवर्जन म्हणून वर्गीकृत
बँकेने एमपी बॉर्डर चेकपोस्ट डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड (१६६.८९ कोटी रुपये), पुणे-सोलापूर रोड डेव्हलपमेंट (७२.७६ कोटी रुपये) आणि सोनाक २७.०८ कोटी रुपयांची थकबाकी जाहीर केली आहे. तिन्ही प्रकरणांमध्ये थकबाकीला फंड डायवर्जन म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. त्यांनी सोनाकविरुद्ध १२.५८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तर इतर दोन खात्यांच्या बाबतीत, तरतुदी संपूर्ण एक्सपोजरच्या समान आहेत, असे इंडियन बँकेने म्हटले आहे.
दरम्यान, सप्टेंबर तिमाहीत इंडियन बँकेचा निव्वळ नफा वाढून रु. १,०८९.१७ कोटी झाला आहे. वार्षिक आधारावर ही सुमारे १६४ टक्क्यांची वाढ आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत इंडियन बँकेचा निव्वळ नफा ४१२.२८ कोटी रुपये होता. गेल्या वर्षीच्या याच कालावधीत ते ४,१४४.०४ कोटी रुपये होते. इंडियन बँकेचे ऑपरेटिंग मार्जिन वाढून २८.६३ टक्के झाले आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत ते २५.३३ टक्के होता.