Join us

भारतीय बँका बुडीत कर्जांमुळेच कमजोर

By admin | Published: October 07, 2016 2:16 AM

नफ्यात घट झाल्यामुळे भारतीय बँकांची स्थिती आणखी कमजोर झाली आहे, असा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिला आहे. बुडीत कर्जांमुळे (एनपीए) ही स्थिती निर्माण झाली असून

वॉशिंगटन : नफ्यात घट झाल्यामुळे भारतीय बँकांची स्थिती आणखी कमजोर झाली आहे, असा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिला आहे. बुडीत कर्जांमुळे (एनपीए) ही स्थिती निर्माण झाली असून, त्यावर तातडीने उपाय करण्याची गरज आहे, असेही नाणेनिधीने म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जारी केलेल्या वित्तीय स्थैर्य अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. अहवालात म्हटले आहे की, बँकिंग व्यवस्था कमजोर झाल्यामुळे त्यांच्या नफ्यात आणखी घट होण्याची शक्यता आहे. विशेषत: भारतासारख्या मंद आर्थिक गती आणि बुडीत कर्जाचे वाढते प्रमाण असलेल्या देशांत ही स्थिती आणखी बिकट आहे. सरकारी बँकांचा एनपीए २0१४-१५ मध्ये ५.४३ टक्क्यांवर (२.६७ लाख कोटी) गेला होता. २0१५-१६ मध्ये तो तब्बल ९.३२ टक्क्यांवर गेला आहे. एनपीए वाढल्यामुळे बँकांचा नफा घटला आहे. नफा भरून काढण्यास अतिरिक्त भांडवलाची तरतूद बँकांना करावी लागत आहे. भारतात ही स्थिती आणखी बिकट आहे. (वृत्तसंस्था)बॅलन्स शीट मार्च २0१७ पर्यंत स्वच्छ करानाणेनिधीने म्हटले की, यातून बाहेर पडण्यासाठी एनपीए पारदर्शक पद्धतीने हुडकून काढणे आवश्यक आहे. भारतासारखे काही देश एनपीए कमी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. तथापि, त्यावर आणखी अधिक आणि योग्य वेळी कारवाई होणे आवश्यक आहे. सूत्रांनी सागितले की, गेल्या काही वर्षांत भारतीय सरकारी बँकांचा एनपीए वाढत आहे. बुडीत कर्जाच्या भरपाईसाठी अधिक निधीची तरतूद करण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेने बँकांना दिले आहेत. तसेच आपल्या बॅलन्स शीट मार्च २0१७ पर्यंत स्वच्छ करण्यास सांगितले आहे. नियम पारदर्शक करा.. बुडीत कर्जांवर मार्ग काढण्यासाठी नाणेनिधीने अनेक मार्ग सूचविले आहेत. कोर्टाबाहेर तडजोडी करणे, कर्जाच्या बदल्यात समभाग घेणे, नियम अधिक पारदर्शक करणे यांचा त्यात समावेश आहे.